Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या महाकुंभ मेळा सुरू आहे. 12 वर्षांनंतर प्रयागराजमध्ये 13 जानेवारी 2025पासून कुंभमेळ्याला सुरुवात झाली असून दररोज लाखो भाविक कुंभमेळ्यात सहभागी होत आहेत. महाकुंभच्या या विशाल सोहळ्याचे अत्यंत शिस्तबद्ध, सुंदर नियोजनाचे जगभरात कौतुक होत आहे. महाकुंभला भेट देणारे अनेक सेलिब्रेटी, पाहुणे आणि नेते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या प्रशासनाचे आभार मानत आहेत.
महाकुंभच्या महासोहळ्याचे महानियोजन कसे करण्यात आले? याबाबत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आता सविस्तर खुलासा केला. एनडीटीव्हीच्या महाकुंभ संवाद या खास कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी NDTV नेटवर्कचे संपादक संजय पुगलिया यांच्यासोबत त्यांनी महाकुंभ संदर्भात अनेक विषयांवर दिलखुलास उत्तरे दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
कशी केली पूर्वतयारी?
सर्वप्रथम प्रयागराजमधील महाकुंभ भरणाऱ्या परिसराचा विस्तार करण्यात आला. पार्किंग आणि भाविकांना लांबचा प्रवास करावा लागू नये याची काळजी घेण्यात आली. प्रयागराज शहरासाठी एक पद्धतशीर विकास योजना पुढे नेण्यात आली. रेल्वे आणि हवाई संपर्क विकसित करण्यात आला. हजारो वर्षांपूर्वी लंका जिंकून, मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री राम पुष्पक विमानात महर्षी भारद्वाजांना भेटण्यासाठी प्रयागराजमध्ये उतरले होते. या हजारो वर्षांत, हा देश प्रयागराजला नागरी टर्मिनल देऊ शकला नाही.
मात्र 2019 मध्ये, पहिल्यांदाच प्रयागराजमध्ये एक सिव्हिल टर्मिनल बांधण्यात आले. प्रयागराजमध्ये 150 हून अधिक रस्ते होते जे सिंगल लेन ते डबल लेन आणि डबल लेन ते फोर लेन करण्यात आले. अंडरपासचे नूतनीकरण करण्यात आले. पूर्वी, शौचालय वाळूमध्ये गाडले जात असे. संपूर्ण जत्रेत एक दुर्गंधी पसरली होती. पण ते बदलण्यात आले. नदीत घाणेरड्या पाण्याचा एक थेंबही वाहून गेलेला नाही, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
अनेक पिढ्यांसाठी अविस्मरणीय ठरेल!
दरम्यान, 'या शतकातील महाकुंभमेळ्याचे आयोजन येणाऱ्या पिढ्यांसाठी अविस्मरणीय राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमासाठी दिलेले स्वप्न पूर्ण वचनबद्धतेने प्रत्यक्षात आणले गेले आणि अशा व्यवस्था करण्यात आल्या. मला आनंद आहे की आतापर्यंत 12 कोटींहून अधिक भाविकांनी पूज्य संतांच्या उपस्थितीत आई गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या त्रिवेणीत स्नान करून पुण्य प्राप्त केले आहे,' असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.