एका अभिनेत्री बरोबर एका युवा नेत्याची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर हा युवानेता त्या अभिनेत्रीला सतत अश्लील मेसेज करत होता. तिला सतत हॉटेलवर येण्यासाठी दबाव टाकत होता असा आरोप त्या अभिनेत्रीने केला आहे. मल्याळम अभिनेत्री रिनी जॉर्ज यांनी केरळच्या एका युवा नेत्यावर हा गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, त्या युवा नेत्याने त्यांना अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवले आहे. तिने या घटनेची तक्रार पक्षाच्या नेतृत्वाकडे केली. पण तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अभिनेत्री रिनी जॉर्ज यांनी बुधवारी माध्यमांना सांगितले की, त्या तीन वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून केरळच्या एका राजकीय पक्षाच्या युवा नेत्याच्या संपर्कात आल्या होत्या. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यासोबत गैरवर्तन केले जात आहे. त्या नेत्याने त्यांना तीन वर्षांपूर्वी पहिल्यांदा अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज पाठवले. यानंतर केरळच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
मल्याळम अभिनेत्रीने आरोप केला आहे की, त्या नेत्याने तिला एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. तथापि, त्या नेत्याचे नाव काय आहे आणि तो कोणत्या पक्षाचा आहे, हे तिने सार्वजनिकपणे सांगितले नाही. पण अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, पक्षाकडे तक्रार करूनही त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, उलट त्याला पक्षात अनेक महत्त्वाची पदे देण्यात आली. या घटनेनंतर पक्ष आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांबद्दल त्यांच्या मनात जी प्रतिमा होती, ती पूर्णपणे खराब झाली.अभिनेत्री रिनीने सांगितले की, तिच्यावर कोणताही हल्ला झाला नाही, पण तिला आक्षेपार्ह संदेश पाठवले गेले. मात्र, तिच्या मित्रांकडून तिला कळले की इतरही अनेक महिलांना अशा छळाचा सामना करावा लागला आहे. ती त्या महिलांसाठी आवाज उठवत आहे. अशा तक्रारी करण्यासाठी लोकांनी योग्य माध्यमांचा वापर केला पाहिजे, यावर अभिनेत्रीने जोर दिला.
पलक्कडचे आमदार राहुल मनकूटाथिल यांच्याशी हा सर्व प्रकार भाजप जोडत आहे. जरी अभिनेत्रीने त्यांचे नाव घेतले नसले तरी, भाजपने या घटनेच्या विरोधात आमदाराच्या पलक्कड येथील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. राहुल मनकूटाथिल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पोलिसांनी हा मोर्चा थांबवला. ज्यामुळे पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. भाजप कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे वृत्तही समोर आले आहे. अनेक कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली होती. नंतर पोलिसांनी त्यांना परिसरातून बाहेर काढले. भाजप नेत्यांचा दावा आहे की, अभिनेत्रीचे आरोप स्पष्टपणे आमदाराच्या गैरवर्तनाकडे इशारा करतात.