Mamta Kulkarni News : एकेकाळी बॉलिवूडमधील आघडीची अभिनेत्री असलेली ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभात ममता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली. त्यापूर्वी तिनं त्रिवेणी संगमात स्वत:चं पिंडदान केलं. ममतानं यापूर्वीच संन्यास घेतला असून ती साध्वीचं आयुष्य जगत आहे. ममता नुकतीच 24 वर्षांनी भारतामध्ये परतली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
किन्नर आखाड्यानं काय सांगितलं?
किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी सांगितलं की, किन्नर आखाडा ममता कुलकर्णीला (माजी बॉलिवूड अभिनेत्री) महामंडलेश्वर बनवत आहे. श्री यमाई ममता नंदगिरी असं त्यांचं नावं ठेवण्यात आलं आहे. ती गेल्या दीड वर्षांपासून किन्नर आखाड्याच्या संपर्कात आहे.
काय आहे किन्नर आखाडा?
किन्नर आखाड्याची स्थापना 2015 साली करण्यात आली. ही एक हिंदू धर्माची संघटना आहे. तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींना आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात समानता आणि मान्यता देणे हा या आखाड्याचा मुख्य उद्देश आहे. आता ममता कुलकर्णीची या आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या आखाड्याला त्यांचा संदेश अधिक वेगानं पसरवण्यासाठी मदत होणार आहे.
ममतानं यापूर्वी NDTV शी बोलताना सांगितलं होतं की, मी आता 50 वर्षांची झाली आहे. मला आता आध्यात्मिक आयुष्य जगायचं आहे. अध्यात्मिक वाद-विवादामध्ये भाग घेण्याची माझी इच्छा आहे. मला सर्वांना एकत्र आणायचं आहे. माझी लग्न करण्याची इच्छा नाही.
( नक्की वाचा : Maha Kumbh 2025 : महाकुंभमेळ्याबाबत पाकिस्तानमध्ये सर्च का केले जात आहे? समजून घ्या खरा अर्थ )
1990 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री ममता कुलकर्णी 24 वर्षानंतर भारतामध्ये परतली आहे. मायदेशात परतल्यानंतर तिनं एक इमोशनल व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामध्ये तिनं महाकुंभात जाण्याची तयारी करत असल्याचं सांगितलं होतं.