न्यायदान करताना न्यायमूर्तींना अनेकदा चित्र-विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागते. या प्रसंगांमुळे अनेकदा त्यांना भयंकर मनस्तापाही सहन करावा लागतो. न्यायमूर्ती अनेकदा आपली नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवतात. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना यांनी व्हि़डीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सामील झालेल्या एका व्यक्तीला खडे बोल सुनावले. कारण हा माणूस सुनावणीसाठी बनियान घालून बसला होता.
बार अँड बेंच या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये म्हटले आहे की सोमवारी सकाळी 11 वाजता एका माणूस व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सामील झाला होता. हा माणूस बनियान घालून बसला होता. न्यायमूर्तींची नजर या व्यक्तीवर पडताच त्या चिडल्या आणि त्यांनी त्यांचे सहकारी न्यायमूर्ती दत्ता यांना विचारले की हा माणूस प्रतिवादी आहे का असाच कोणीतरी येऊन बसलेला आहे? यानंचतर न्यायमूर्तींनी म्हटले की, या माणसाला उचलून बाहेर फेका, असं कसं होऊ शकतं? यानंतर न्यायालय प्रशासनाने या व्यक्तीला हटविण्यास सांगितले.
वादी किंवा प्रतिवाद्यांच्या कपड्यांवरून न्यायमूर्ती नाराज होण्याची ही पहिली वेळ नाहीये. 2020 साली एक माणूस सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला उघडाबंब बसला होता. ज्याला पाहिल्यानंतर न्यायमूर्ती संतापले होते. न्यायमूर्ती एल.नागेश्वर आणि न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्या खंडपीठाने या व्यक्तीसंदर्भात नाराजी व्यक्त केली होती. वादी प्रतिवादी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये उघडे किंवा बनियान घालून बसले होतेच शिवाय काही वकिलांनीही असले प्रकार केले होते. असाच एक प्रकार सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे सुनावणी करत असलेल्या प्रकरणातही घडला होता.
2020 साली सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. यावेळी एक वकील शर्ट न घालताच युक्तिवादासाठी येऊन बसला होता. यावरून न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी या वकिलाला फटकारले होते. त्यांनी म्हटले होते की मला कोणाविरोधात टोकाचे बोलणे आवडत नाही मात्र तुम्ही स्क्रीनवर आहात, त्यामुळे तुम्हाला काही पथ्ये पाळावीच लागतील. त्याचवर्षी एक वकील पलंगावर झोपून, टीशर्ट घालून सुनावणीसाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये सामील झाला होता.