अंतराळ आणि खोल समुद्रात भारत, मानवाला पाठवणार असून ही मानवी मोहीम 2025 साली हाती घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय विज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितली आहे. दिल्लीमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, 2025 साली भारत अंतरालात आणि खोल समुद्रात मानव पाठवणार आहे. या मोहिमेत सहभागी होणाऱ्या सदस्यांची नावेही निश्चित करण्यात आली आहेत. अंतराळ मोहिमेला गगनयान असे नाव देण्यात आले असून या मोहिमेत 4 जण सहभागी होणार आहेत. 3 ग्रुप कॅप्टन आणि एका विंग कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. या चौघांना चार दिवसांच्या अंतराळ मोहिमेवर पाठवण्यात येणार असून या मोहिमेतील अंतराळ यान पृथ्वीपासून 400 किलोमीटर उंचीवर जाऊन परीक्रमा करून परतणार आहे.
प्रशांत बालकृष्णन नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि विंग कमांडर शुभांशू शुक्ला यांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे. गगनयानप्रमाणेच खोल समुद्रात जाऊन अभ्यास करण्यासाठी 'डीप-सी मिशन' हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेला समुद्रयान म्हणण्यात येत असून यासाठी तीन जणांची निवड करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी तयार करण्यात आलेली पाणबुडी ही भारतामध्ये बनविण्यात आली आहे. हिंद महासागरात 6 हजार मीटर खोलवर ही पाणबुडी जाणार आहे.
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी अंतराळ क्षेत्रातील भारताच्या कामगिरीबद्दल गौरवौद्गार काढले. या क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे रॉकेट आणि उपग्रह प्रक्षेपित करण्याव्यतिरिक्त, अंतराळ क्षेत्राचा कृषी, पायाभूत सुविधा, दळणवळण, आरोग्य सेवा इत्यादींवर सकारात्मक परिणाम होणार आहे.सिंह यांनी म्हटले की, “2022 मध्ये आपल्याकडे फक्त एकच स्पेस स्टार्टअप होते मात्र 2024 मध्ये अवकाश क्षेत्र खासगी सहभागासाठी खुले करण्यात आले. यानंतर भारतात जवळपास 200 स्टार्टअप उभे राहणार असून हे जागतिक क्षमतेचे आहेत.सिंह यांनी म्हटले की अवघ्या काही महिन्यांत अंतराळ क्षेत्रात 1,000 कोटी रुपयांची खासगी गुंतवणूक आली आहे.