मायक्रोसॉफ्टच्या ऑनलाईन सेवा यंत्रणेतील बिघाडाचा जगभरातील अनेक विमान कंपन्या आणि विमानतळांना फटका बसला आहे. भारतामध्येही याचा परिणाम दिसत असून इंडिगो विमान कंपनीला या बिघाडामुळे आपली 200 उड्डाणे रद्द करावी लागली. याबाबत इंडिगोने X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे माहिती दिली आहे. इंडिगोने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "जगभरातील वाहतूक यंत्रणा कोलमडली आहे. ज्यामुळे विमानसेवा एकामागोमाग एक रद्द होऊ लागल्या आहेत. ही परिस्थिती आमच्याही नियंत्रणाबाहेरची आहे. सध्या पुन्हा बुकींगची आणि रिफंडसाठीची यंत्रणा बंद आहे. रद्द झालेल्या फ्लाईटस पाहण्यासाठी या https://bit.ly/4d5dUcZ लिंकवर क्लिक करा. आपल्याहोत असलेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करत असून आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत "
इंडिगोने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, जवळपास 192 उड्डाणे ही रद्द करण्यात आली आहेत. यातील बहुतांश उड्डाणे ही दिल्ली, बंगळुरू आणि मुंबईची आहेत. मायक्रोसॉफ्टच्या Azure या क्लाऊड कॉम्प्युटींग प्लॅटफॉर्ममधील तांत्रिक बिघाडामुळे विविध देशांप्रमाणे भारतालाही फटका बसला आहे. इंडिगोशिवाय स्पाईसजेट, एअर इंडिया आणि विस्तारा कंपनीच्या उड्डाणांनाही या बिघाडाचा फटका बसला आहे. या बिघाडामुळे विमानांची उड्डाणे रद्द होण्याव्यतिरिक्त प्रवाशांना विमानाची दीर्घकाळ वाट पाहायला लागणे, चेक इनला विलंब होणे या त्रासाला सामोरे जावे लागले. या बिघाडामुळे विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.
इंडिगो विमान कंपनीने प्रवाशांसाठी एक सूचना जारी केली आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, Microsoft Azure मध्ये निर्माण झालेल्या समस्येमुळे आमच्या संपूर्ण सेवेवर परिणाम झाली आहे. यामुळे विमातळावर असलेल्या आमच्या संपर्क केंद्रांवरील गर्दी वाढायला लागली आहे. प्रवाशांना चेक इनला विलंब होत असून दीर्घकाळ रांगेत उभे राहावे लागत आहे.
गोव्यामध्येही विमानसेवेला फटका
शुक्रवारी गोव्यातील मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून दोन उड्डाणे तर दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तीन उड्डाणे रद्द करण्यात आली. गोव्यातून मुंबई आणि बंगळुरूला जाणारी इंडिगोची दोन उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. गोव्याहून मुंबईला जाणारे रात्री 8.40 वाजताच्या सुमारासचे आणि बंगळुरूला रात्री 10.10 निघणारे विमान रद्द करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्ट च्या यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बोर्डींग पास हाताने लिहून दिले आणि सामानासाठीचे टॅगही हाताने बांधले. या सगळ्यामुळे उड्डाणांना आणखी विलंब झाला. दाबोळी विमानतळाचे कार्यकारी संचालक जयराजन एमसी यांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी १०.१० वाजता इंडिगो आणि एअर इंडिया एक्सप्रेस एअरलाइन्सद्वारे वापरल्या जात असलेल्या चेक इन सॉफ्टवेअरमध्ये समस्या निर्माण झाली होती, ज्यामुळे प्रवाशांना चेक इन करता आले नाही.