'बबीता पांडेला पऱ्या घेऊन गेल्या?'...27 दिवसांपासून बेपत्ता तरुणीचं गूढ वाढलं! वाचा का होतीय ही चर्चा

Babita Pandey missing case: 24 वर्षांची एमबीएची विद्यार्थिनी बबीता पांडे अचानक बेपत्ता झाली आहे. तिला बेपत्ता होऊन तब्बल 27 दिवस उलटून गेले आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins
Babita Pandey missing case: 27 दिवसांपासून बबीताचा कोणताही सुगावा लागलेला नाही.
मुंबई:

Babita Pandey missing case: हिमालय पर्वतामधील एका रहस्यमयी घटनेने सध्या संपूर्ण देशाला विचार करायला लावले आहे. उंचावरील जंगले, बर्फाच्छादित डोंगर आणि दऱ्याखोऱ्यांनी वेढलेल्या या भागात घडलेली ही घटना विज्ञानापलीकडची आहे की घातपाताची, याचा शोध सध्या घेतला जात आहे. 21 व्या शतकात हायटेक तंत्रज्ञान, ड्रोन कॅमेरे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या काळातही निसर्गाच्या एका अशा गूढ कोपऱ्याची चर्चा सुरू झाली आहे, जिथे आजही जुन्या लोककथा जिवंत असल्याचे मानले जाते.

काय आहे प्रकरण?

उत्तरकाशी येथील प्रसिद्ध दयारा बुग्याल ट्रेकवरून 24 वर्षांची एमबीएची विद्यार्थिनी बबीता पांडे अचानक बेपत्ता झाली आहे. तिला बेपत्ता होऊन तब्बल 27 दिवस उलटून गेले आहेत. उत्तराखंडच्या रामनगर भागात राहणारी बबीता 29 मे रोजी या ट्रेकिंग दरम्यान रहस्यमयी पद्धतीने गायब झाली.

Advertisement

बबीताला शोधण्यासाठी पोलीस, प्रशासन, एसडीआरएफ, एनडीआरएफ, आयटीबीपी, वन विभाग, डॉग स्क्वाड, गोताखोर आणि नेहरू पर्वतारोहण संस्थेचे 100 पेक्षा जास्त जवान अहोरात्र मोहीम राबवत आहेत, पण अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही. मोबाईल सर्व्हिलन्स, सीडीआर आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू असला, तरी स्थानिक लोकांमध्ये एका वेगळ्याच गोष्टीची चर्चा सुरू आहे.

( नक्की वाचा : Kalyan News : 2 ते 3 महिनेच चालेल असं म्हणत तुकाराम मुंढेंना धमकावलं; कल्याण पोलिसांनी 4 तासातच जिरवली मस्ती )

बबीताला पऱ्या घेऊन गेल्या?

उत्तराखंडच्या लोकसंस्कृतीमध्ये आणि लोककथांमध्ये परीच्या गोष्टींना खूप महत्त्वाचे स्थान आहे. स्थानिक भाषेत परीला आंचरी किंवा वनदेवी असे म्हटले जाते. टिहरी जिल्ह्यातील खैट पर्वत हा तर पऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो आणि तिथे तसा अधिकृत बोर्डही लावण्यात आला आहे. बबीता ज्या भागातून बेपत्ता झाली, तिथल्या काही स्थानिक लोकांच्या दाव्यानुसार, तिला पऱ्यांनी आपल्यासोबत नेले असावे. 

या भागात अनेक वर्षांपासून ट्रेकिंग करणारे आशुतोष सांगतात की, हा संपूर्ण परिसर घनदाट जंगलांचा आणि उंच टेकड्यांचा आहे. इतके दिवस शोध घेऊनही काहीच हाती न लागल्याने जुन्या पौराणिक समजुती पुन्हा चर्चेत आल्या आहेत. अर्थात नवीन पिढीला यावर विश्वास नाही, पण डोंगराळ भागात राहणारे ज्येष्ठ नागरिक आजही या कथांवर ठाम आहेत.

निसर्गाचे गूढ नियम आणि पर्वतावरील अदृश्य शक्ती

या उंचावरील आणि निर्जन भागात गेल्यावर कोणीतरी आजूबाजूला असल्याचा भास होतो, असे अनुभवी ट्रेकर्स सांगतात. येथील स्थानिक समजुतीनुसार, या उंच पर्वतांवर गडद किंवा चमकी असलेले कपडे घालून जाण्यास मनाई आहे. तसेच तिथे मोठ्याने ओरडणे, गाणी वाजवणे किंवा गोंधळ घालण्यासही सक्त मनाई केली जाते. यी नियमांचे उल्लंघन झाले, तर तिथल्या अदृश्य शक्ती कोपतात, अशी भावना आजही येथील लोकांमध्ये आहे.

Advertisement

(नक्की वाचा : Pune News:सियाच्या अफेयरची घरातील मंडळींना होती कल्पना, 35 वर्षांच्या मैत्रीमध्ये कुणी कालवलं विष? वाचा... )

काय आहे लोककथा?

खैट पर्वताशी संबंधित दोन मोठ्या लोककथा या भागात सांगितल्या जातात. पहिल्या कथेनुसार, चौडा गावातील आशा रावत नावाच्या व्यक्तीला 9 अतिशय सुंदर मुली होत्या. त्या जेव्हा केवळ 12 वर्षांच्या होत्या, तेव्हा एका सकाळी अचानक सगळीकडे अंधार झाला, पण खैट पर्वताच्या दिशेने एक अनोखा प्रकाश चमकत होता. त्या 9 बहिणी तो प्रकाश पाहण्यासाठी तिकडे गेल्या आणि कधीच परत आल्या नाहीत. 

त्या सर्वजणी परी झाल्या आणि आजही या 9 पर्वतांवर राहून त्या परिसराचे रक्षण करतात, असे मानले जाते. दुसरी कथा जीतू बगडवाल या देखण्या मुलाची आहे, जो खूप सुंदर बासरी वाजवायचा. खैट पर्वताजवळ बासरी वाजवत असताना त्याच्या धुनवर मोहित होऊन परी त्याला आपल्यासोबत नेल्याची कथा सांगितली जाते.

Advertisement

वैज्ञानिक तपास विरुद्ध स्थानिक श्रद्धा

सध्या पोलीस आणि प्रशासन सर्व आधुनिक आणि वैज्ञानिक साधनांच्या मदतीने बबीताचा शोध घेत आहेत. ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांचा वापर करून जंगलाचा कानाकोपरा शोधला जात आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि व्यावसायिक लोकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करत आहेत. मात्र, 27 दिवस उलटूनही बबीता पांडेचा कोणताही मागमुस लागलेला नाही. बबीताचे कुटुंबीय तिच्या सुखरूप परतण्याची वाट पाहत आहेत.