सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉटसअप आणि टेलेग्राम ही दोन संपर्कासाठीची अॅप्स वापरता येणार नाही. यापुढे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारी कामासाठी फक्त 'संदेश इन्स्टंट मेसेजिंग' अॅपच वापरावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील आदेश शुक्रवारी जारी केला आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एनआयसी) द्वारे विकसित करण्यात आलेल्या 'संदेश' अॅपचा वापर केंद्र शासनातील सर्व अधिकारी व कर्मचारी, विविध - राज्य शासनांमधील 200 हून अधिक शासकीय संस्था करत आहेत. 350 हून अधिक ई-गव्हर्नन्स अॅप्लिकेशन्समध्ये संदेश सूचना आणि ओटीपी पाठवण्यासाठी केला जात आहे.
केंद्रद्वारे विकसित करण्यात आलेल्या 'संदेश' अॅपचा वापर करण्याबाबत सर्व विभाग आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय कार्यालयांना सूचना देण्यात येत आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांना इतर सोशल मीडिया अॅप वापरण्याची सवय झाल्यामुळे त्यांना या आदेशामुळे थोड्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
का घेण्यात आला निर्णय ?
संस्थेच्या स्तरावर प्रोफाइल तपशिलाची दृश्यमानता (Visibility) लपवण्याची सुविधा आहे. संदेश सुरक्षितपणे पाठवणे आणि प्राप्त करणे, सुरक्षितपणे स्टोअर करणे, ओटीपी पाठवणे व वितरित न झालेला डेटा सुरक्षित ठेवणे यासाठी शासन व शासकीय कार्यालये यांच्या गरजेनुसार अनुकूलित करण्याची सुविधा आहे. एनक्रिप्टेड मेसेज आणि फाइल्स पाठवण्यासाठी egov अॅप्लिकेशन्ससह सेवा आधारित एकीकरण यात आहे. अनौपचारिक आणि अधिकृत गट तयार करण्याची सुविधाही यात आहे.