Exclusive : रतन टाटांना सिंगूरलाच Nano चा कारखाना का उभारायचा होता? नीरा राडिया यांनी सांगितली कहाणी

नीरा (Niira Radia) यांनी 2000 ते 2012 या काळात टाटा समूहासाठी जनसंपर्काचे काम सांभाळले होते. रतन टाटा (Ratan Tata) हे नीरा राडिया यांचे अत्यंत जवळचे मित्र होते आणि त्या त्यांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती होत्या.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

Ratan Tata Death: रतन टाटा  (Ratan Tata) यांच्या निधनानंतर नीरा राडिया यांची पहिली आणि Exclusive मुलाखत NDTV वर प्रसिद्ध झाली. गेल्या 12 वर्षांत त्यांनी एकाही माध्यमाला अशा पद्धतीची मुलाखत दिली नव्हती. कॉर्पोरेट पीआरओ म्हणून एकेकाळी काम केलेल्या राडिया यांनी रतन टाटा यांच्याबाबतच्या अशा आठवणी सांगितल्या ज्या कालपर्यंत फक्त त्यांनाच ठाऊक होत्या. रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. 86 वर्षांच्या रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला होता. 

नीरा राडिया या वैष्णवी कम्युनिकेशन नावाच्या पीआर कंपनीच्या माजी अध्यक्षा आहेत.  नॅनो कार बाजारात आणण्याच्या रतन टाटांच्या निर्णयाबद्दल नीरा यांनी काही आठवणी सांगितल्या. 1 लाखात मिळेल अशी गाडी टाटा यांनी का बनवण्याचं ठरवलं याचं कारण नीरा यांनी सांगितले. त्यांनी म्हटले की," रतन टाटा यांना सर्वसामान्य माणसासाठी काहीतरी करायचे होते.  सामान्य माणसाला बाईकवरून पावसात भिजत जावं लागू नये अशी त्यांची इच्छा होती. एका वर्तमानपत्राने म्हटले होते की रतन टाटा यांना 1 लाखात मिळेल अशी कार बनवायची होती, मात्र रतन टाटा यांनी अशी कोणतीही रक्कम जाहीर केली नव्हती. "

रतन टाटा यांनी नॅनोच्या निर्मितीसाठी सिंगूरची निवड का केली, असे विचारले असता नीरा यांनी सांगितले की, रतन टाटा यांना बंगालमध्ये रोजगार आणि औद्योगिकीकरण वाढवायचे होते. या प्रकल्पाचे राजकारण होऊ नये तिथे विकास व्हावा असे रतन टाटा यांना वाटत होते. त्यामुळे त्यांनी नॅनो कार निर्मिती सिंगूरला करू अशी घोषणा केली होती. या प्रकल्पावरून गदारोळ सुरू झाला तेव्हा टाटा समूह कोरसचे अधिग्रहण करण्यासाठीच्या हालचाली करत होता. कालांतराने हा प्रकल्प गुजरातमधील साणंद इथे हलविण्यात आला. सिंगूरमधील समस्या ही नॅनो किंवा रतन टाटा यांच्याबद्दलची नव्हती. तिथली समस्या आणि संघर्ष हा राजकीय स्वरुपाचा होता. सिंगूर हा त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याचा मतदारसंघ होता. आम्ही या प्रकल्पासाठी अनेक जागा शोधल्या होत्या, अनेक राज्यांचा दौरा केला होता. आम्हाला पंजाब, कर्नाटकातील अनेकांनी बोलावले होते, मात्र आम्ही गुजरातला हा प्रकल्प हलविण्याचा निर्णय घेतला कारण गुजरातमध्ये थोडे अधिक औद्योगिकीकरण झाले होते आणि गुजरात विकासाकडे झेपावत होता. त्यामुळे इथे हा प्रकल्प आणणे सोपे होते.  नीरा यांनी 2000 ते 2012 या काळात टाटा समूहासाठी जनसंपर्काचे काम सांभाळले होते. रतन टाटा हे नीरा राडिया यांचे अत्यंत जवळचे मित्र होते आणि त्या त्यांच्या अत्यंत विश्वासातील व्यक्ती होत्या. राडिया यांनी सांगितले की नॅनोला फारसं यश न मिळाल्याने रतन टाटा निराश झाले होते. नॅनो कारला प्रचंड यश मिळेल असं रतन टाटांना वाटत होतं, मात्र तसं झालं नाही. 

जॅकी पळाल्याचं कळालं आणि हलकल्लोळ झाला

रतन टाटा हे श्वानप्रेमी होती. नीरा यांनी रतन टाटा यांच्या श्वानप्रेमाबद्दलही सांगितले. त्यांनी म्हटले की, , "मी त्यावेळी मुंबईतील गेस्ट हाऊसमध्ये राहात होते. तिथे काही भटके कुत्रेही राहायचे. रतन टाटांनी मला विचारले की मी काही कुत्र्‍यांची देखभाल करू शकेन का ? यावर मी त्यांना होकारार्थी उत्तर दिलं. एके दिवशी रतन टाटा यांचा ड्रायव्हर जॅकी नावाच्या कुत्र्‍यासाठी रोज जेवण घेऊन यायचा. त्याला गेस्ट हाऊसमध्येच जेवण दिलं जायचं. जॅकीचं सततच्या खाण्यामुळे वजन वाढलं होतं, आणि त्याला फिरवण्यासाठी बाहेर नेण्यास सुरुवात झाली. एकेदिवशी ड्रायव्हरने त्याला मरीन ड्राईव्हला फिरायला नेलं. , तिथून जॅकी पळून गेला. यानंतर टायकोट घातलेली पीआर म्हणून काम करणारी माणसं वेड्यासारखी जॅकीला शोधायला मरीन ड्राईव्हचा परिसर पिंजून काढताना दिसली. रतन टाटा यांना मी फोन करून जॅकी हरवल्याचं सांगितलं. मात्र अखेर जॅकी आम्हाला मिळाला. "

तुम्हाला तुमचे काम करावेच लागेल!

नीरा यांनी आणखी एक किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले की,  विमानतळावर अन्य प्रवाशांप्रमाणे रतन टाटादेखील सुरक्षा तपासणीच्या रांगेत उभे होते. तपासणीसाठी उभे असताना त्यांना एका सुरक्षा रक्षकाने ओळखलं आणि त्यांना सलाम ठोकला आणि त्यांना न तपासता जाऊ दिलं. मात्र टाटा यांनी नम्रतेने त्याचा आग्रह नाकारला आणि तपासणी करूनच पुढे जाण्याचा निर्णय त्याला सांगितला. सुरक्षा रक्षकासोबत शेक हँड करताना टाटा यांनी त्याला सांगितले की तुम्हाला तुमचे काम करावेच लागेल. "