- राष्ट्रीय महामार्गांच्या कडेला पेट्रोल पंप, फूड कोर्ट किंवा व्यावसायिक प्रकल्पांसाठी एनओसी आता ऑनलाइन मिळणार
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजमार्ग प्रवेश नावाचा डिजिटल पोर्टल लाँच केलं आहे
- पोर्टलवर अर्जाची सद्यस्थिती रिअल-टाइममध्ये पाहता येणार असून ठराविक कालमर्यादेत मंजुरी देण्याचे बंधन आहे
National Highway NOC Portal: राष्ट्रीय महामार्गांच्या लगत पेट्रोल पंप, फूड कोर्ट किंवा इतर व्यावसायिक प्रकल्पांसाठी आवश्यक असलेल्या परवानग्या आता अधिक गतीने आणि पारदर्शकपणे मिळणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 'राजमार्ग प्रवेश' (Rajmarg Pravesh) या पोर्टलची अद्ययावत आवृत्ती लाँच केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या डिजिटल प्लॅटफॉर्मचे उद्घाटन केले असून, यामुळे लालफितीचा कारभार संपुष्टात येऊन उद्योजकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे हायवे लगत रेस्टॉरंट असतील किंवा पेट्रोल पंप असतील त्यांना सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
या पोर्टलमुळे आता 'नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट' (NOC) मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज उरणार नाही. रस्ते जोडणी, रेस्ट एरिया, तसेच गॅस आणि पाणी पाईपलाईन टाकण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या एका क्लिकवर उपलब्ध होतील. अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येणार असून, ठराविक कालमर्यादेत मंजुरी देण्याचे बंधनही यंत्रणेवर असेल. त्यामुळी ही प्रक्रीया अत्यंत पारदर्शक असेल अशी काळजी घेण्यात आली आहे. गडकरींच्या पुढाकाराने ही गोष्ट करण्यात आली आहे.
तुम्ही राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेट्रोल पंप, हॉटेल किंवा फूड कोर्ट उघडण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये चपला झिजवाव्या लागणार नाहीत. केंद्र सरकारने 'राजमार्ग प्रवेश' नावाचे नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. "आता प्रक्रिया वेगवान, पारदर्शक आणि सोपी होईल," असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी महामार्गाशी संबंधित एनओसी मिळवण्यासाठी अनेक महिने लागायचे. मात्र, आता खासगी कंपन्यांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वजण ऑनलाइन अर्ज करू शकतील.यामुळे वेळेची बचत होईल आणि भ्रष्टाचारालाही चाप बसेल.
पोर्टलची वैशिष्ट्ये:
- ऑनलाईन अर्ज: पेट्रोल पंप, फूड कोर्ट आणि रेस्ट एरियासाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सोय.
- ट्रॅकिंग सुविधा: अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे, याची माहिती रिअल-टाइममध्ये मिळेल.
- इतर सेवा: पाणी, गॅस पाईपलाईन आणि वीज वाहिन्यांच्या कामांसाठी तात्काळ एनओसी.
- पारदर्शकता: मानवी हस्तक्षेप कमी झाल्यामुळे प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि वेळेत पूर्ण होईल.
या नवीन प्रणालीमुळे महामार्गांच्या कडेला गुंतवणूक वाढून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा मंत्रालयाचा अंदाज आहे.