रुपेश सामंत
माटुंग्याचं एक दाम्पत्य गोव्याला फिरायला गेलं होतं. मात्र ते परतलं नाही. मुंबईहून 14 जणांचा एक ग्रुप गोव्याला फिरायला गेला होता. या ग्रुपमध्ये हे दाम्पत्य देखील होते. कांदोळी येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले असताना त्यांच्यासोबत दुर्घटना घडली ज्यात या दोघांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास हे दाम्पत्य कांदोळी येथे फिरायला गेले होते.
सुट्टीसाठी गोव्याला आलेल्या एका ग्रुपवर सध्या शोककळा पसरली आहे. आनंदासाठी, मौजमजेसाठी आलेल्या या ग्रुपमधील सदस्यांना अपार दु:ख झाले आहे, कारण त्यांच्या ग्रुपमधील एका दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुट्टीसाठी, मौजमजेसाठी हा ग्रुप गोव्यात आला होता आणि यातील हे वृद्ध दाम्पत्य कांदोळी येथील समुद्रकिनाऱ्यावर फिरायला गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत आणखी एक दाम्पत्य होते. समुद्र किनाऱ्यावर फिरत असताना या दाम्पत्याला आणि त्यांच्यासोबतच्या दाम्पत्यापैकी महिलेला लाटांचा तडाखा बसला. लाटेच्या तडाख्यामध्ये हे तिघेही जण समुद्रात वाहून गेले. पोहता येत नसल्याने हे तिघेही जण बुडाले. यातील कल्पना सतीश पारेख (68) यांना बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. प्रकाश के दोशी (73) आणि हर्षिता दोशी (69) हे दाम्पत्य मात्र बुडाले ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
पर्यटक पोलिस आणि जीवरक्षक दलाच्या जवानांना तिघे बुडत असल्याचे दिसल्यानंतर त्यांनी तातडीने हालचाल करत या तिघांना पाण्यातून बाहेर काढले. कांदोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात या तिघांना नेले असता दोशी दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. कल्पना पारेख यांना वाचवण्यात यश आले असून त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.