One House Two States India: कल्पना करा, स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागत असेल तर? बरं ऐवढचं नाही तर झोपण्यासाठी ही पुन्हा स्वतःच्या राज्यात यावे लागत असेल, तर? भारतात असा एक अनोखा परिसर आहे जिथे एकाच कुटुंबाच्या घरातून दोन राज्यांची सीमा जाते. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेल्या जीवरगाडा (महाराजगुडा) या गावात पवार कुटुंब राहते. त्यांच्या घराच्या मध्य भागातून ही सीमा रेषा जाते. त्यामुळे भिंतीवर एका बाजूला महाराष्ट्र तर दुसऱ्या बाजूला तेलंगणा असे स्पष्ट लिहिलेले आहे. त्यामुळे या कुटुंबाचे किचन तेलंगणात तर बेडरूम महाराष्ट्रात आहे.
या घराची कहाणी 1956 मधील भाषावार प्रांतरचनेपासून सुरू होते. 1956 नंतर 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मात्र, खरा टर्निंग पॉइंट 1969 मध्ये आला होता. जेव्हा सीमा निश्चितीसाठी अधिकृत सर्व्हे करण्यात आला. शासकीय अधिकाऱ्यांनी रेष आखली तेव्हा ती पवार यांच्या घराच्या अगदी मध्य भागातून गेली. त्यामुळे स्वयंपाकघर तेलंगणात आणि बेडरूम महाराष्ट्रात गेले. त्यामुळे पवार कुटुंब हे अर्ध तेलंगणात तर अर्ध महाराष्ट्रात आहे. म्हणजे उडी मारली की ते तेलंगणात जातात, तर दुसरी उडी मारून ते महाराष्ट्रात येता.
मात्र या भौगोलिक परिस्थितीमुळे पवार कुटुंबातील सदस्यांना एक वेगळाच लाभ झाला आहे. या सदस्यांना दोन्ही राज्यांचे नागरिक मानले जात आहे. त्यांच्याकडे दोन्ही राज्याच्या नागरिकत्वाचे पुरावे आहेत. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र आणि तेलंगणा या 2 राज्यांच्या विविध सरकारी योजनांचा लाभ मिळतो. त्याचा लाभ हे कुटुंब ही घेत असतं. विशेष म्हणजे या कुटुंबाकडे दोन्ही राज्यांचे वेगळे ओळखपत्र, आधार कार्ड आणि टॅक्स बिले देखील आहेत. त्यामुळे एका क्षणात ते मराठी ही आहेत तर दुसऱ्या क्षणाला ते तेलगू ही आहेत.
हे गाव आणि या गावातलं हे घर सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र आहे. ते पाहण्यासाठी ही लोक इथं येत असतात. एकाच छताखाली दोन राज्ये इथं अनुभवता येतात. स्वयंपाकघर तेलंगणात तर बेडरूम महाराष्ट्रात असा विचार ही कुणी केला नसेल. पण या गावातल्या पवार कुटुंबाची ही आता अनोखी ओळख होवून बसली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्याच्या सीमेवर वसलेले हे घर त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ते या वेगळे पणामुळे चर्चेत ही असते. त्यांच्या घरावर ही त्यांनी एक रेष मारली आहे. त्यात तेलंगणा आणि महाराष्ट्र असा उल्लेख ही केला आहे.