Ajit Doval Speech : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर' राबवले. या ऑपरेशनमध्ये भारताच्या सामर्थ्याचं संपूर्ण जगाला दर्शन झालं. या ऑपरेशनच्या अंमलबजावणीतील महत्त्वाची व्यक्ती म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल. डोवाल यांनी शुक्रवारी (11 जुलै 2025) ऑपरेशन सिंदूरबाबत सविस्तर माहिती दिली. डोवाल यांनी यावेळी ऑपरेशन सिंदूर'च्या वृत्तांकनावरून परदेशी माध्यमांना फटकारले. पाकिस्तानी हल्ल्यांमुळे भारतीय पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याचे पुरावे देण्याचे आव्हान त्यांनी माध्यमांना दिले.
एक तरी फोटो दाखवा!
आयआयटी मद्रासच्या 62 व्या दीक्षांत समारंभात बोलताना अजित डोवाल यांनी 'ऑपरेशन सिंदूर'बद्दल सांगितले. त्यांनी यावेळी परदेशी माध्यमांचा 'पूर्वग्रहदूषितपणा' अधोरेखित केला. ते म्हणाले की, परदेशी माध्यमांनी "पाकिस्तानने असे केले आणि तसे केले" असे वृत्त दिले, परंतु याबाबत प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये केवळ भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या तळांवर केलेल्या नुकसानीचेच दर्शन होते.
( नक्की वाचा : Operation Sindoor: 'आमच्याकडं फक्त 30 सेकंद...,' ब्राह्मोसमुळे पाकिस्तान का उडाली होती खळबळ? )
"परदेशी माध्यमांनी म्हटले की, पाकिस्तानने ते केले आणि हे केले. मला एक तरी फोटो दाखवा, ज्यात कोणत्याही भारतीय संरचनेचे) नुकसान झाल्याचे, अगदी काचेचा एक तुकडाही तुटल्याचे दिसते, असं आव्हान डोवाल यांनी दिलं. याबाबत प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये 10 मे आणि नंतर पाकिस्तानमधील 13 (उदा. सरगोधा, रहीम यार खान, चकलाल) चित्रण होते, असं त्यांनी सांगितलं.
आम्ही सक्षम आहोत!
"मी तुम्हाला फक्त परदेशी माध्यमांनी प्रतिमांच्या आधारे जे काही प्रसिद्ध केले ते सांगत आहे. आम्ही (पाकिस्तानी हवाई तळांचे) नुकसान करण्यास सक्षम आहोत," असेही डोवाल यांनी सांगितले.
9 आणि 10 मे च्या मध्यरात्री, भारतीय हवाई दलाने इतर दलांच्या सक्रिय मदतीने देशाच्या कानाकोपऱ्यातील पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ले केले आणि या प्रक्रियेत पाकिस्तानच्या चीनी हवाई संरक्षण प्रणालींनाही निकामी केले.
( नक्की वाचा : PM मोदींना उगाच नाही AJIT DOVAL यांच्यावर विश्वास! भारताच्या जेम्स बाँडला घाबरतात पाकिस्तान-चीन )
संरक्षण आस्थापनांमधील सूत्रांनी एएनआयला सांगितले की, पाकिस्तान हवाई दलाच्या तळांना लक्ष्य करण्यासाठी भारतीय हवाई दलाने सुमारे 15 ब्रह्मोस क्षेपणास्त्रे डागली, ज्याचा उद्देश त्यांची विमाने उड्डाण करण्याची आणि इतर ऑपरेशन्स करण्याची क्षमता बाधित करणे हा होता.
ऑपरेशन सिंदूरबद्दल पुढे बोलताना अजित डोवाल यांनी भारतीय स्वदेशी संरक्षण क्षमतांनी संघर्षादरम्यान कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली हे अधोरेखित केले आणि अधिक स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज असल्याचे आवाहन केले.
"आपल्याला आपले स्वदेशी तंत्रज्ञान विकसित करावे लागेल. येथे सिंदूरचा उल्लेख करण्यात आला. त्यात किती स्वदेशी सामग्री होती याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे. आमची काही सर्वोत्तम प्रणाली होती, मग ती ब्रह्मोस क्षेपणास्त्रे असोत, आमची एकात्मिक हवाई नियंत्रण आणि कमांड प्रणाली असो, किंवा आमचे रडार असोत, याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणे निश्चित केली होती. ती सीमावर्ती भागात नव्हती. आम्ही त्याशिवाय इतर कुठेही हल्ला केला नाही. ते अगदी नेमके होते जिथे आम्हाला कोण कुठे आहे हे माहित होते. संपूर्ण ऑपरेशनला 23 मिनिटे लागली," अशी माहिती डोभाल यांनी दिली.