VIDEO: खासदाराने दोन्ही कृत्रिम पाय टेबलवर ठेवले! सभागृहात सांगितली 31 वर्षांपूर्वीची क्रुर घटना, ऐकणारे सुन्न

राज्यसभेमध्ये भाजप खासदार सी. सदानंदन मास्टर यांनी आपले दोन्ही कृत्रिम पाय काढून टेबलवर ठेवले, ज्यामुळे बराच गोंधळ पाहायला मिळाला.

जाहिरात
Read Time: 2 mins

 MP C Sadanandan Master Parliament VIDEO: दिल्लीमध्ये सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी- विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळत आहे. अशातच  सोमवारी कामकाज सुरु असताना घडलेल्या एका घटनेने अख्खं सभागृह स्तब्ध झाले. राज्यसभेमध्ये भाजप खासदार सी. सदानंदन मास्टर यांनी आपले दोन्ही कृत्रिम पाय काढून टेबलवर ठेवले, ज्यामुळे बराच गोंधळ पाहायला मिळाला. यावेळी त्यांनी 31 वर्षांपूर्वीच्या प्रकरणाचा उल्लेख करत त्यांच्यासोबत घडलेली भयंकर घटना सांगितली. 

दोन्ही कृत्रिम पाय टेबलवर ठेवले..

भाजपचे राज्यसभा खासदार सदानंदन मास्टर यांनी  सभागृहात सांगितले की, "अध्यक्ष हे माझे दोन्ही पाय आहेत. मी दोन पाय असलेला एक बलवान माणूस होतो. पण आता माझे गुडघ्याखाली कृत्रिम अवयव आहेत. मी सभागृहात नेहमीच लोकशाहीबद्दल ऐकतो.  आज लोकशाहीबद्दल ओरड करणाऱ्यांनी ३१ वर्षांपूर्वी केरळमध्ये माझ्यावर हल्ला केला, ज्यामध्ये मला त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागले, असे म्हणत त्यांनी सीपीएमच्या कार्यकर्त्यांवर आरोप केले.  यामुळे सीपीएमने सभागृहात निषेध केला. या पक्षांची वचनबद्धता लोकशाही मूल्यांशी नाही तर राजकीय हिंसाचाराशी आहे," असंही ते म्हणाले. 

Rahul Gandhi: राहुल गांधींनी कोणता नियम मोडला? चक्क एका पुस्तकामुळे जाऊ शकते खासदारकी; काय आहे प्रकरण?

सदानंदन मास्टर यांच्या भाषणावेळी  विरोधी पक्षांनी गोंधळ घातला. त्यांनी राज्यसभेत आभार प्रस्तावावर त्यांचे कृत्रिम पाय टेबलावर ठेवून बोलण्यास सुरुवात केली तेव्हा केरळमधील सीपीआय(एम) खासदार जॉन ब्रिटास यांनी मुद्दा उपस्थित केला. नियमांचा हवाला देत त्यांनी सभागृहात त्यांचे कृत्रिम अवयव प्रदर्शित करण्यास आक्षेप घेतला. यावेळी राज्यसभा अध्यक्ष  सीपी राधाकृष्णन यांनी सदानंदन मास्टर यांना कृत्रिम पाय खाली ठेवण्याचे निर्देश देऊ असे आश्वासन दिले.   दरम्यान, सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी जॉन ब्रिटास यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान सदानंदन यांनी उच्चारलेले असंसदीय शब्द वगळण्याची विनंती अध्यक्षांना केली.

31 वर्षांपूर्वी झालेला हल्ला 

 केरळच्या कन्नूर जिल्ह्यातून येणारे सी. सदानंदन मास्टर यांची गेल्या वर्षी जुलैमध्ये राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. ते भाजप-आरएसएसशी संबंधित आहेत. त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून बी.कॉम. पदवी आणि कालिकत विद्यापीठातून बी.एड. पदवी घेतली आहे. अध्यापनाव्यतिरिक्त त्यांनी केरळमधील राष्ट्रीय शिक्षक संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले.  २५ जानेवारी १९९४ रोजी त्यांच्यावर केरळमधील सीपीआयएमच्या कार्यकर्तांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला होता, ज्यामध्ये त्यांचे दोन्ही पाय करवतीने कापण्यात आले होते.

सदानंदन यांची कौटुंबिक पार्श्वभूमी कम्युनिस्ट होती. तथापि, विद्यार्थीदशेत ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) द्वारे आरएसएसमध्ये सामील झाले. २०१६ आणि २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत, भाजपने त्यांना कुथुपरंबा विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे केले, हा परिसर १९९० च्या दशकात असंख्य राजकीय हत्याकांडांचा साक्षीदार होता.

Advertisement