केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एनडीटीव्हीशी खास बातचीत करताना देशाशी संबंधित विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षमतेबद्दल आणि नेतृत्वाच्या गुणांबद्दल बोलताना शाह म्हणाले की, त्यांना मोदींसोबत प्रत्येक स्तरावर काम करण्याचा अनुभव मिळाला आहे. मोदी हे असे नेते आहेत, जे संघटनेतील सामान्य कार्यकर्त्यांपासून ते देशाच्या पंतप्रधानपदापर्यंत प्रत्येक भूमिकेत यशस्वी ठरले आहेत.
सर्वोच्च नेता कसा असावा?
शाह यांनी सांगितले की, 'सर्वोच्च नेता कसा काम करतो, हे मोदींनी दाखवून दिले आहे. सर्वांचे विचार ऐकून घेणे आणि त्यानंतर सामूहिक निर्णय घेण्यासाठी आपल्या अनुभवाच्या आधारावर सर्वोत्तम कल्पना सादर करणे, हे त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वाचे वैशिष्ट्य आहे. कार्यकर्ता, संघटनेचा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या सर्व भूमिकांमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. असं शाह म्हणाले.
गंभीरपणे ऐकतात आणि मार्गदर्शन करतात
एनडीटीव्हीचे मुख्य संपादक राहुल कंवल यांच्याशी बोलताना अमित शाह म्हणाले, 'गेली 40 वर्षे मी त्यांना (मोदींना) जवळून पाहिले आहे. ते देशहितासाठी कठोर निर्णय घेतात. ते लोकांचे म्हणणे गंभीरपणे ऐकतात आणि योग्य मार्गदर्शन करतात. ते आपले विचार कधीच कोणावर लादत नाहीत. देशाची मूळ विचारधारा आणि सर्व समस्या लक्षात घेऊन ते काम करतात. मंत्रिमंडळाच्या बैठकांमधील निर्णयांच्या वेळी वातावरणाबद्दल विचारले असता, शाह म्हणाले की, 'पंतप्रधान मोदी अत्यंत संयमी आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते संबंधित मंत्र्याचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतात. अनेकदा इतर मंत्री म्हणतात की, आता पुरे झाले, पण पंतप्रधान पूर्ण गोष्ट ऐकल्यानंतरच आपले मत मांडतात. असं त्यांनी सांगितलं.
मोदी मित्र आहेत की बॉस?
मोदींसोबतच्या वैयक्तिक नात्याबद्दल विचारले असता, 'ते तुमचे मित्र आहेत की बॉस?' या प्रश्नावर शाह म्हणाले, 'भाजपमध्ये बॉससारखी कोणतीही परंपरा नाही. आम्ही सर्वजण एकत्र काम करतो. ते आमचे नेते आहेत. आपल्याला त्यांच्या बद्दल अतील आदर आहे असं ही शाह यांनी सांगितले.
पराभव कुणालाही आवडत नाही
'पंतप्रधानांना पराभव आवडत नाही, ते जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे म्हणतात. यावर तुमचे काय मत आहे?' या प्रश्नावर शाह म्हणाले, 'पराभव कुणालाही आवडत नाही. हे कुणाच्या ही स्वभाव असू नये. पण तुम्ही कशाला विजय मानता, यावर सर्वकाही अवलंबून असते. राम आणि रावण दोघांनाही जिंकायचे होते, पण विजयाचा उद्देश काय होता, हे महत्त्वाचे आहे असं अमित शाह म्हणाले.
मोदी 'हार्ड टास्कमास्टर' आहेत का?
पंतप्रधान मोदी 'हार्ड टास्कमास्टर' असल्याबद्दलच्या प्रश्नावर शाह म्हणाले की, 'देशहिताच्या गंभीर मुद्द्यांवर पंतप्रधान अत्यंत गांभीर्याने काम करतात. देशाचे संरक्षण आणि सुरक्षिततेच्या मुद्द्यांवर ते पूर्ण निर्भयतेने आणि ठामपणे निर्णय घेतात. असहमती असलेल्या मुद्द्यांवर संसदीय समिती स्थापन करण्याचा उल्लेख करताना अमित शाह यांना विचारले की मोदींच्या कार्यशैलीत आता बदल झाला आहे का? तेव्हा ते म्हणाले, 'असे नाही. मुद्द्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन आधीही संसदीय समिती आणि इतर संयुक्त मंचांच्या माध्यमातून सर्व संबंधित पक्षांना सोबत घेऊन पुढे वाटचाल केली आहे, असं त्यांनी सांगितले.