बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देशातील प्रमुख नेत्यांच्या दौऱ्यांची मालिका सुरू आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बेगुसराय येथे प्रचारसभा घेतली. या सभेव्यतिरिक्त राहुल गांधी यांनी स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी थेट एका तळ्यात उडी घेऊन मच्छिमारांसोबत मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक केले. यावेळी त्यांच्यासोबत व्हीआयपी पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहनी उपस्थित होते.
मासेमारीच्या या अनुभवादरम्यान, राहुल गांधी यांनी स्थानिक मच्छिमार बांधवांशी त्यांच्या कामातील आव्हाने आणि संघर्ष यावर सविस्तर चर्चा केली. काँग्रेस पक्षाने त्यांच्या 'एक्स' (पूर्वीचे ट्विटर) सोशल मीडिया अकाउंटवर याचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओसोबतच 'महागठबंधन'ने (Mahagathbandhan) मच्छिमार समुदायासाठी दिलेल्या आश्वासनांची यादीही काँग्रेसने जाहीर केली. त्यातील प्रमुख आश्वासने खालीलप्रमाणे आहेत.
- लीन पीरियड मासेमारी प्रतिबंधित कालावधी, 3 महिने दरम्यान प्रत्येक मच्छिमार कुटुंबाला Rs.5,000 ची आर्थिक मदत.
- मत्स्यपालन विमा योजना सुरू करणे आणि बाजाराची उपलब्धता सुनिश्चित करणे.
- प्रत्येक ब्लॉकमध्ये मासे बाजार, प्रशिक्षण केंद्र आणि अनुदान योजना सुरू करणे.
- सुसंगत जलाशय धोरणांतर्गत नद्या आणि तलावांचे पुनरुज्जीवन करणे आणि वाटपामध्ये पारंपरिक मच्छिमारांना प्राधान्य देणे.
यावेळी निवडणूक सभेत बोलताना राहुल गांधी यांनी केंद्र आणि बिहार सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "बिहारचे लोक जगभर प्रगती करत आहेत. पण इथे ते मागे पडले आहेत. इथल्या सरकारला येथील लोकांनी पुढे यावे असे वाटत नाही. ते इथल्या लोकांना मदत करत नाहीत. त्यांना वाटते की इथल्या लोकांनी फक्त मजुरी करावी. दुबईसारखे शहर बिहारच्या लोकांनीच बांधले आहे, पण त्यांना आपल्या राज्यात काही करता येत नाही, असे ते म्हणाले.