विरोधी पक्षांच्या 'इंडी' आघाडीचे नेतृत्त्व करणाऱ्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची खूर्ची धोक्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी या आघाडीचं नेतृत्त्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर 'इंडी' आघाडीतील नेते त्यांच्या पाठिंब्यासाठी पुढे येत आहेत. समाजवादी पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं यापूर्वीच ममता यांना पाठिंबा दिला होता. आता त्यापाठोपाठ राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी देखील ममतांना पाठिंबा दिला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले लालू?
लालू प्रसाद यादव यांना पाटणामध्ये पत्रकारांनी ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलेल्या इच्छेवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर 'इंडी' आघाडीचं नेतृत्त्व ममता बॅनर्जी यांनी करावं. आम्ही सहमत आहोत, असं लालूंनी सांगितलं. काँग्रेसच्या आक्षेपाबाबत लालूंना विचारलं असता, 'काँग्रेसनं विरोध करुन काहीही होत नाही. ममता बॅनर्जी यांच्याकडंच नेतृत्व द्यावं,' असं लालूंनी स्पष्ट केलं.
ममता बॅनर्जी यांनी काही दिवसांपूर्वी 'इंडी' आघाडीच्या कारभारावर असमाधान व्यक्त केलं होतं. त्याचबरोबर संधी मिळाली तर या आघाडीचं नेतृत्त्व करण्याची इच्छाही ममता यांनी व्यक्त केली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीसह या नव्या जबाबदारीसाठी आपण सज्ज असल्याचं ममता यांनी म्हंटलं होतं.
( नक्की वाचा : राहुल गांधींशी कनेक्शन असल्याचा आरोप असलेले George Soros कोण आहेत? )
संसदेच्या अधिवेशनात मतभेद
संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनातही 'इंडी' आघाडीमधील मतभेद उघड झाले होते. नरेंद्र मोदी सरकारला सभागृहात कोणत्या मुद्यावर कोंडीत पकडायचं? यावर विरोधकांमध्ये मतभेद आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसनं अदाणींच्या मुद्यावर संसदेत चर्चा करण्याची मागणी केलीय. काँग्रेस खासदारांच्या गोंधळामुळे अनेकदा संसदेचं कामकाज तहकूब करावं लागलं.
त्याचवेळी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं या धोरणांवर नाराजी व्यक्त केली होती. संसदेच्या कामकाजात जीवनावश्यक मुद्यांवर सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत ही तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची भूमीका आहे. अदाणींच्या मुद्यावर काँग्रेसकडून सुुरु असलेल्या आंदोलनामध्ये 'इंडी' आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाची खासदारांची संख्या असलेला तृणमूल काँग्रेस गैरहजर आहे. तृणमूलच्या गैरहजेरीमुळे 'इंडी' आघाडीतील मतभेद उघड झाले आहेत.