Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी वाड्रा यांचा मुलगा आणि राहुल गांधी यांचा भाचा रेहान वाड्रा याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आनंदाची बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे. रेहानने त्याची बालपणीची मैत्रीण आणि दीर्घकाळापासूनची गर्लफ्रेंड अवीवा बेग हिच्याशी साखरपुडा केला असून या वृत्ताला आता अधिकृत दुजोरा मिळाला आहे. स्वतः रेहानने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून अवीवा सोबतचा एक सुंदर फोटो शेअर करून या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
रेहान वाड्राची इंस्टाग्रामवर कबुली
रेहानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्याने कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी आणि अंगठीचा इमोजी वापरला आहे. यावरून त्याने त्याचा साखरपुडा झाल्याचे स्पष्ट केले आहे.
या फोटोमध्ये अवीवा बेग देखील टॅग आहे. रेहानची ही पोस्ट सोशल मीडियावर येताच त्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला असून गांधी-वाड्रा परिवाराच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
जोधपुरी सूट आणि वेलवेट साडीत दिसली जोडी
साखरपुड्याच्या या फोटोमध्ये रेहान वाड्रा अतिशय देखणा दिसत असून त्याने फॉर्मल जोधपुरी पेहराव केला आहे. दुसरीकडे अवीवा बेग वाईन रंगाच्या वेलवेट साडीमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. रेहानने या पोस्टमध्ये 29 डिसेंबर 2025 ही तारीख लिहिली आहे, ज्यावरून त्यांचा साखरपुडा 29 डिसेंबर रोजी पार पडल्याचे समजते.
हा फोटो राजस्थानमधील रणथंबोर येथील असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे, कारण याच काळात संपूर्ण गांधी-वाड्रा कुटुंब तिथे वास्तव्यास होते.
( नक्की वाचा : Raihan Vadra : क्रिकेटच्या मैदानात अपघात, एका डोळ्याची दृष्टी गमावली;कोण आहे प्रियांका गांधींचा मुलगा रेहान? )
रेहान आणि अवीवा यांची बालपणापासूनची मैत्री
रेहान वाड्रा आणि अवीवा बेग हे एकमेकांना बालपणापासून ओळखतात. अवीवाच्या आई नंदिता बेग या प्रियांका वाड्रा यांच्या जवळच्या मैत्रीण आहेत. सोशल मीडियावर या दोघांच्या बालपणाचे फोटोही व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये रेहान पांढऱ्या कुर्त्यात तर अवीवा पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दोन वेण्या घालून अतिशय गोंडस दिसत आहे. अनेक वर्षांच्या या मैत्रीचे रूपांतर आता लग्नाच्या दिशेने पडलेल्या पहिल्या पाऊलात झाले आहे.
रणथंबोरमधील शाही सोहळा
गांधी-वाड्रा कुटुंब नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी चार दिवसांच्या रणथंबोर दौऱ्यावर गेले होते. याच दरम्यान हॉटेल शेरबागमध्ये रेहान आणि अवीवाचा साखरपुडा झाल्याची जोरदार चर्चा रंगली होती. जरी हा दौरा खासगी असल्याने अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती, तरीही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. आता रेहानने स्वतः पोस्ट शेअर केल्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. रॉबर्ट वाड्रा आणि अवीवाचे वडील इमरान बेग यांचाही एक संवाद साधतानाचा फोटो समोर आला आहे.