Bullet Train: देशात बुलेट ट्रेन कधी धावणार? सरकारनं दिली मोठी माहिती, वाचा सर्व अपडेट

Bullet Train Project: मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानची प्रस्तावित बुलेट ट्रेन कधी सुरु होणार? या मार्गाचं आत्तापर्यंत किती काम झालंय? त्यासाठी किती खर्च झालाय? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Bullet Train: बुलेट ट्रेनबाबत सरकारनं महत्त्वाची माहिती दिली आहे.

Bullet Train Project: मुंबई आणि अहमदाबाद दरम्यानची प्रस्तावित बुलेट ट्रेन कधी सुरु होणार? या मार्गाचं आत्तापर्यंत किती काम झालंय? त्यासाठी किती खर्च झालाय? याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले की,  देशात पहिली बुलेट ट्रेन डिसेंबर 2029 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाचे संपूर्ण काम डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे मूल्यांकन करून प्रत्यक्ष रेल्वे  सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे सरकारने स्पष्ट केले.

Advertisement

सरकारने माहिती दिली की, एक लाख आठ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा 81 टक्के खर्च जपानमधील एक कंपनी उचलत आहे. उर्वरित खर्च रेल्वे मंत्रालय, गुजरात आणि महाराष्ट्र सरकारे मिळून करत आहेत. या वर्षातील 30 जूनपर्यंत या प्रकल्पावर 78 हजार 839 कोटी रुपये खर्च झाले होते.

Advertisement

देशात बुलेट ट्रेन कधीपासून धावेल?

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी लोकसभेत गुजरातच्या खेडा येथील भाजप खासदार देवुसिंह चौहान आणि सुरत येथील भाजप खासदार मुकेश दलाल यांच्या लेखी प्रश्नांना उत्तर देताना ही माहिती दिली. या भाजप खासदारांनी मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाची सद्यस्थिती आणि या मार्गावर बुलेट ट्रेन कधीपासून धावेल, तसेच त्यासाठी किती अर्थसंकल्प मंजूर झाला आहे आणि त्यापैकी किती खर्च झाला आहे? याबाबत प्रश्न विचारला आहे.

Advertisement

( नक्की वाचा : Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी का दिला राजीनामा? 10 तासांमध्ये काय घडलं? वाचा Inside Story )
 

या प्रश्नांच्या उत्तरात रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (MAHSR) प्रकल्प एकूण 508 किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पाचे काम जपान सरकारच्या आर्थिक आणि तांत्रिक मदतीने सुरू आहे. बुलेट ट्रेन महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा नगर हवेलीमधून जाईल. या मार्गावर एकूण 12 स्टेशन – मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती – तयार केली जातील.

बुलेट ट्रेनवर किती खर्च येईल?

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये वापी ते साबरमती दरम्यानच्या भागाचे काम डिसेंबर 2027 पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे. तर, संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यांनी स्पष्ट केले की बुलेट ट्रेन प्रकल्प हा एक अत्यंत जटिल प्रकल्प आहे, त्यामुळे त्याचे पूर्णत्व निश्चित करणे नागरी बांधकाम, ट्रॅक, वीज, सिग्नल, दूरसंचार आणि ट्रेनचे संच मिळाल्यानंतरच शक्य होईल.

या प्रकल्पावर एकूण खर्च सुमारे एक लाख आठ हजार कोटी रुपये येईल, असे त्यांनी सांगितले. यापैकी 81 टक्के खर्च जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी (JICA) करत आहे, जो सुमारे 88 हजार कोटी रुपयांच्या बरोबरीचा आहे. उर्वरित 19 टक्के किंवा 20 हजार कोटी रुपये रेल्वे मंत्रालय, गुजरात आणि महाराष्ट्र मिळून खर्च करतील. यातील 50 टक्के हिस्सा रेल्वे मंत्रालय आणि प्रत्येकी 25-25 टक्के हिस्सा गुजरात आणि महाराष्ट्र पुरवतील. या प्रकल्पावर या वर्षातील 30 जूनपर्यंत सुमारे 78 हजार 839 कोटी रुपये खर्च झाले होते. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या संपूर्ण जमिनीचे अधिग्रहण झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, भारतातील MAHSR कॉरिडॉरच्या पलीकडे बुलेट ट्रेन नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि व्यावसायिक, आर्थिक तसेच पर्यटन महत्त्वाच्या शहरांमधील वाढती प्रवासी मागणी पूर्ण करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड विस्तृत प्रकल्प अहवाल (DPR) तयार करत आहे.
 

Topics mentioned in this article