Ram Mandir Flag Significance :अयोध्यामधील भव्य राम मंदिराच्या शिखरावर धर्म ध्वजाची ऐतिहासिक स्थापना करण्यात आली आहे. हा क्षण केवळ धार्मिक नसून, शतकानुशतके चाललेल्या संघर्षाच्या आणि सामूहिक प्रयत्नांच्या यशाचा प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शिखरावर भगवा ध्वज दिमाखात फडकवण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि राम मंदिर ट्रस्टचे गोविंदगिरी महाराज हे देखील उपस्थित होते.
या ऐतिहासिक प्रसंगानंतर देशाला संबोधित करताना, पंतप्रधान मोदी यांनी हा ध्वज केवळ धार्मिक प्रतीक नसून, तो संकल्प, यश आणि उच्च आदर्शांचा उद्घोष असल्याचे सांगितले. पंतप्रधांनी त्यांच्या भाषणातून या दिव्य ध्वजाचे 13 अर्थ स्पष्ट केले, जे भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शक ठरतील.
PM मोदींनी उलगडले धर्म ध्वजाचे 13 अर्थ
पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितलं की, हा धर्म ध्वज अनेक महत्त्वाच्या मूल्यांचे आणि भावनांचे प्रतिनिधित्व करतो. पंतप्रधानांनी यावेळी सांगितलेले 13 अर्थ खालीलप्रमाणे आहेत.
1. हा ध्वज संकल्प आहे: राम मंदिर उभारणीसाठी केलेला दृढ निश्चय आणि तो पूर्ण करण्याची जिद्द याचे प्रतीक आहे.
2. हा ध्वज यश आहे: अनेक दशकांच्या संघर्षानंतर मिळालेल्या भव्य विजयाचे प्रतीक.
3. संघर्ष ते सृजनाची गाथा: अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साकार झालेले हे रामभक्तांचे स्वप्न आहे.
4. शतकानुशतके चाललेल्या स्वप्नांचे साकार स्वरूप: कोट्यवधी रामभक्तांच्या आकांक्षांचे हे फळ आहे.
5. संतांची साधना आणि समाजाच्या सहभागाचा परिणाम: या महान कार्यासाठी झालेल्या सामूहिक प्रयत्नांचे हे चिन्ह आहे.
6. प्रभू रामाच्या आदर्शांचा उद्घोष: धर्म, सत्य आणि मर्यादेचा जगाला दिलेला संदेश.
7. ‘सत्यमेव जयते' चे आवाहन: सत्याच्या अंतिम विजयाची घोषणा करणारा हा ध्वज आहे.
8. ‘सत्यं एक पदं': ब्रह्मस्वरूपी सत्य या ध्वजात प्रतिष्ठित आहे.
9. ‘प्राण जाय पर वचन न जाई': वचन पाळण्याची आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा.
10. ‘कर्म प्रधान विश्व रचि राखा': कर्तव्य आणि कर्माची जीवनातील प्रधानता दर्शवणारा संदेश.
11. भेदभाव, वेदना आणि त्रासातून मुक्तीची इच्छा: समाजात शांती आणि सुखाची स्थापना व्हावी ही कामना.
12. 'नही दरिद्र कोऊ दुखी न दीना': कोणीही गरीब किंवा दुःखी राहू नये, अशा एका आदर्श समाजाची कल्पना.
13. दूरून रामललाच्या जन्मभूमीचे दर्शन: जे लोक मंदिरात येऊ शकत नाहीत, त्यांना या ध्वजाचे दर्शन होऊन पुण्य प्राप्त करण्याची संधी.
( नक्की वाचा : RSS Diwali Message: संघ स्वयंसेवक दिवाळी शुभेच्छा देताना 'या' 5 गोष्टींचा उल्लेख का करत आहेत? जाणून घ्या अर्थ )
ध्वजाला प्रणाम करूनही पुण्य मिळवा
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी एका महत्त्वपूर्ण गोष्टीचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आपल्या धर्मग्रंथांमध्ये लिहिले आहे की, जे लोक मंदिरात येऊ शकत नाहीत, ते दूरून या ध्वजाला प्रणाम करूनही पुण्य मिळवू शकतात. या क्षणाला त्यांनी जगभरातील कोट्यवधी रामभक्तांसाठी अविस्मरणीय असे म्हटले आहे.
राम मंदिर, सामाजिक सामर्थ्याची चेतना स्थळ
पंतप्रधान मोदी म्हणाले की, राम मंदिराचा हा दिव्य परिसर भारताच्या सामूहिक सामर्थ्याची चेतना स्थळी बनत आहे. या प्रांगणात सप्त मंदिर (सात मंदिरे) उभारण्यात आली आहेत.येथे माता शबरीचे मंदिर आहे, जे आदिवासी समाजाचे प्रेमभाव आणि आदरातिथ्य दर्शवते.
येथे निषादराजाचे मंदिर आहे, जे साधनसंपत्तीपेक्षा भावनेला अधिक महत्त्व देणाऱ्या मैत्रीचे प्रतीक आहे. एकाच ठिकाणी माता अहिल्या, महर्षी वाल्मिकी, महर्षी वशिष्ठ, महर्षी विश्वामित्र, महर्षी अगस्त्य आणि संत तुलसीदास यांचेही दर्शन होते. याशिवाय, येथे जटायू आणि गिलहरीची शिल्पे देखील आहेत, जी मोठ्या संकल्पांच्या सिद्धीसाठी प्रत्येक छोट्या प्रयत्नाचे महत्त्व सांगतात.
पंतप्रधान मोदींनी प्रत्येक देशवासीयांना आवाहन केले आहे की, तुम्ही राम मंदिराचे दर्शन कराल, तेव्हा या सप्त मंदिरांचे दर्शनही जरूर घ्या. ही मंदिरे आस्था, मैत्री आणि सामाजिक सलोख्याच्या मूल्यांना अधिक बळ देतात. राम भेदाने नाही, तर केवळ भावाने जोडले जातात, असे त्यांनी ठामपणे सांगितले.