Ratan Tata Family : देशातीलच नाही जगातील बड्या उद्योगसमुहामध्ये टाटा ग्रुपचा समावेश आहे. टाटा ग्रुपचे माजी संचालक आणि ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटा तब्बल 3800 कोटींच्या संपत्तीचे मालक होते. ते शेवटपर्यंत अविवाहित होते. रतन टाटा यांना एक सख्खे भाऊ देखील होते, त्यांच्याबद्दल फारशी कुणालाही माहिती नाही. टाटा ग्रुपचे ट्रस्टी आणि अनेक कंपनीचे संचालक असलेले जिमी टाटा हे रतन टाटा यांचे लहान भाऊ. ते रतन टाटांपेक्षा फक्त 2 वर्षांनी लहान आहेत.
रतन टाटा यांनी संपूर्ण आयुष्य साधेपणानं जगले. प्रसिद्धीचा त्यांना कधीही हव्यास नव्हता. त्यांचे भाऊ देखील वेगळे नाहीत. देशातील अग्रगण्य उद्योगसमुहात जन्मलेले जिमी टाटा मुंबईतल्या कुलाबामध्ये एका 2 BHK फ्लॅटमध्ये प्रसिद्धीपासून दूर साधेपणानं आयुष्य जगतात. त्यांनीही मोठ्या भावाप्रमाणं लग्न केलं नाही. ते नेहमीच मीडिया आणि प्रसिद्धीपासून दूर राहिले आहेत.
काही वर्षांपूर्वी उद्योगपती हर्ष गोयंका यांनी जिमी टाटांबद्दल एक ट्विट केलं होतं. त्यावेळी सर्वांना त्यांच्याबद्दल समजलं. गोयंका यांनी ट्विटमध्ये सांगितलं की ते कुलाबामधील दोन बेडरुम फ्लॅटमध्ये राहातात. त्यांना व्यवसायामध्ये कोणताही रस नाही. ते स्क्वॅश छान खेळतात. त्यांनी मला अनेकदा हरवलं आहे. टाटा समुहाप्रमाणेच ते प्रसिद्धीपासून दूर राहतात.
मोठ्या भावाचं घेतलं अंत्यदर्शन
जिमी टाटा यांनी गुरुवारी त्यांचे मोठे भाऊ रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेतलं. लहानपणी एकत्र वाढलेले, एकत्र धमाल-मस्ती केलेले जिमी त्यांच्या लाडक्या भावाला शेवटचा निरोप द्यायला आले होते. त्यांचा मोठा भाऊ शेवटच्या प्रवासाला निघाला होता. त्याला निरोप देण्यासाठी जिमी व्हिलचेअरवर तिथं दाखल झाले. त्यांनी काही काळ डोळे भरुन रतन टाटा यांचं दर्शन घेतलं. त्यांनी आयुष्यात काय गमावलंय हे त्यांचा चेहराच सांगत होता.
जिमी टाटा हे रतन टाटा यांचे लहान भाऊ आहेत. तर नोएल टाटा सावत्र भाऊ आहेत. रतन टाटा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अगदी कमी बोलत असतं. त्यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर जिमी यांच्यासोबतचा लहाणपणीचा फोटो शेअर केला होता. तो 1945 सालातील फोटो होता. रतन आणि जिमी टाटा तसंच त्यांचा पाळीव कुत्रा यांचा तो फोटो होता. 'ते खूप सुंदर दिवस होते. तेव्हा आमच्यात कुणीही नव्हतं,' असं कॅप्शन रतन टाटा यांनी त्या फोटोला दिलं होतं.