ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात शोकाकूल वातावरण आहे. मुंबईत अनेक दिग्गजांनी रतन टाटा यांच्या पार्थिवाचं दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. टाटा समुहाला जागतिक स्तरावर नवी ओळख देणाऱ्या रतन टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. रतन टाटांचा कुत्र्यांवर फार जीव होता. टाटाच्या सर्व परिसरात भटक्या कुत्र्यांना मुक्त प्रवेश होता. रतन टाटा यांचा पाळीव कुत्रा 'गोवा' नं देखील गुरुवारी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कसं पडलं गोवा नाव?
आपल्या मालकाला शेवटचं पाहताना गोवा या पाळीव कुत्र्याचे डोळे देखील भरुन आले होते. टाटांनी त्याचं नाव गोवा का ठेवलं? याचं देखील एक खास कारण आहे. रतन टाटा एकदा गोव्याला गेले होते. त्यावेळी हा कुत्रा त्यांच्याभोवती घुटमळत होता. टाटा त्याला घेऊन मुंबईत आले.
टाटांनी त्याचं नाव गोवा ठेवलं. 'गोवा' मुंबईतील 'बॉम्बे हाऊस'मध्ये अन्य कुत्र्यांसोबत राहात होता. कुत्र्यांबद्दल रतन टाटांना वाटणाऱ्या जिव्हाळ्याचं वर्णन शब्दात करणे अशक्य आहे.
कुत्र्याची देखभाल करणाऱ्या केअरटेकरनं दिलेल्या माहितीनुसार गोवा गेल्या 11 वर्षांपासून रतन टाटांसोबत होता. रतन टाटाचं त्याच्यावर विशेष प्रेम होतं. तो गोव्यात आणण्यात आला होता. त्यामुळे त्याचं नाव गोवा ठेवण्यात आलं होतं.
कुत्र्यांच्या देखभालीसाठी ब्रिटन दौरा रद्द
ताज हॉटेल असो वा टाटा समुहाचं मुख्यालय कुठंही कुत्र्यांच्या प्रवेशाला मनाई नव्हती. आजारी कुत्र्यांच्या देखभालीत व्यस्त असल्यानं रतन टाटा ब्रिटनचे तत्कालीन प्रिन्स चार्ल्स यांना भेटू शकले नव्हते असा किस्सा देखील सांगितला जातो. बर्मिंगहॅम पॅलेसमध्ये चार्ल्स यांनी एक खास कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला रतन टाटा यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. पण, त्यावेळी त्यांचे काही कुत्रे आजारी होते. त्यामुळे आजारी कुत्र्यांची सेवा करण्यासाठी रतन टाटा यांनी ब्रिटनचा दौरा रद्द केला होता.