Hormuz Strait India Iran News: होर्मुजच्या सामुद्रधुनीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक तेल व्यापाराचा मुख्य मार्ग असलेल्या होर्मुज स्ट्रेटमधील जहाजांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणने या मार्गावरून जाणाऱ्या जहाजांवर निर्बंध लादल्याने जगभरात इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला असून भारतातही गॅस पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, आता भारतासाठी इराणने मैत्रीचा हात पुढे केला असून भारतीय जहाजांना या मार्गावरून सुरक्षित वाटचाल करण्याची परवानगी देण्याचे संकेत दिले आहेत.
काय म्हणाले इराणचे राजदूत?
भारतात असलेले इराणचे राजदूत मोहम्मद फतहाली यांनी शुक्रवारी संध्याकाळी पत्रकारांशी संवाद साधताना एक मोठा सकारात्मक संकेत दिला आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना सुरक्षित मार्ग दिला जाईल का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.
फतहाली म्हणाले की, पुढील 2 ते 3 तासांत तुम्हाला याचे परिणाम दिसून येतील. इराण आणि भारत हे मित्र देश असून दोन्ही देशांचे हितसंबंध एकच आहेत, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. युद्धानंतरच्या परिस्थितीत भारताने इराणला विविध क्षेत्रात मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
( नक्की वाचा : US Iran War: तेहरानवर अण्वस्त्रांचे सावट? ट्रम्प यांचा 'विनाशकारी' इशारा आणि 4 मोठे संकेत )
भारत आणि इराणमधील द्विपक्षीय संबंधांबाबत बोलताना मोहम्मद फतहाली यांनी सांगितले की, भारत सरकारसोबत इराणचे अत्यंत चांगले संबंध आहेत. नुकतीच दोन्ही देशांच्या उच्च अधिकाऱ्यांमध्ये या विषयावर सविस्तर चर्चा झाली आहे. विविध क्षेत्रांमधील अडथळे दूर करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत आणि नजीकच्या भविष्यात या संदर्भात अधिक चांगल्या बातम्या मिळतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. देवाकडे प्रार्थना करून सर्व समस्या लवकर सुटाव्यात, अशी भावनाही त्यांनी बोलून दाखवली.
होर्मुज स्ट्रेटचे महत्त्व आणि भारतासाठी दिलासा
फारसच्या आखाताला जागतिक बाजारपेठेला जोडणारा होर्मुज स्ट्रेट हा मार्ग जागतिक तेल व्यापारासाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. इराणने या मार्गावरील वाहतूक रोखल्यामुळे अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे.
( नक्की वाचा : Iran US War: इराणमध्ये नवा 'बॉस'! मोजताबा खामेनींच्या पहिल्याच भाषणाने जगात खळबळ; अमेरिकेला दिली मोठी धमकी )
भारतातही परिस्थितीवर नियंत्रण असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी गॅस पुरवठ्याबाबत चर्चा सुरू होती. अशा वेळी इराणच्या राजदूतांनी भारताला एक महत्त्वाचा भागीदार मानून भारतीय जहाजांना सेफ पैसेज देण्याची घोषणा केल्यामुळे भारताला मोठा आर्थिक आणि धोरणात्मक दिलासा मिळाला आहे.