राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी मुंबईत आयोजित 'रायझिंग राजस्थान' कार्यक्रमानंतर मोठी घोषणा केली आहे.राजस्थानमध्ये इंडस्ट्रियल पार्क उभारणार असल्याचं त्यांनी म्हटलं. एनडीटीव्हीशी खास बातचीत करताना भजनलाल शर्मा यांनी सांगितले की, "काल मुंबईत रोड शो झाला. मुंबई ही आर्थिक राजधानी असून राजस्थानमधील अनेक लोक येथे राहतात. मी त्या लोकांनाही आमंत्रण देण्यासाठी आलो आहे. राजस्थानमध्ये उद्योगांसाठी अपार शक्यता आहेत. त्यामुळे तिथे या आणि आपले उद्योग उभारा."
मुख्यमंत्री भजनलाल शर्मा पुढे म्हणाले की. "आम्ही राज्यभर फिरू. जगातील 25 देशांसोबत आम्ही संपर्कात आहोत. सर्व ठिकाणी अधिकारी तैनात करण्यात येणार आहेत. आम्ही गुंतवणूकदारांना चांगल्या सुविधा देऊ. सिंगल विंडो सिस्टिमच्या आधारे उद्योग उभारण्यासाठी गुंतवणूकदारांना मदत केली जाईल."
"मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. राजस्थानातील हजारो लोक येथे काम करतात. त्यांनी राजस्थानात यावे आणि तेथे काम सुरू करावे. यासाठी मी सर्वांना निमंत्रण देण्यासाठी आलो आहे. राजस्थानमध्ये खनिज, पर्यटन, ऑटोमोबाईल, वस्त्रोद्योग यासह प्रत्येक क्षेत्रात अनेक शक्यता आहेत. मुंबई रोड शो दरम्यान सुमारे 4.5 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे", अशी माहितीही त्यांनी दिली.
"माझे गुंतवणूकदारांशी बोलणे झाले आहे. येथे गुंतवणुकीबाबत गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड उत्साह आहे. लोकांना येथे उद्योग उभारायचे आहेत. आम्ही चांगल्या सुविधा देऊ. वेळेत काम केले जाईल. येथे पर्यटनालाही खूप महत्त्व आहे. राजस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्था चांगली आहे आणि आम्ही पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी ओळखले जातो. येथील पर्यटन क्षेत्रात भरपूर वाव आहे. यावर आम्ही सातत्याने काम करत आहोत", असंही भजनलाल शर्मा यांनी म्हटलं.