BJP MLA Golu Shukla's Son's Lavish Wedding Under Scrutiny : एका शाही विवाहाच्या दृश्यांनी सध्या सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या लग्नातील सजावट, पाहुण्यांची मांदियाळी आणि विशेषतः फटाक्यांची आतषबाजी पाहून सर्वसामान्यांचे डोळे दिपले आहेत. केवळ फटाक्यांवर झालेला खर्च ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या आलिशान सोहळ्याचे व्हिडिओ सध्या इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहेत.
भाजपा आमदाराच्या मुलाचे लग्न
हा भव्य सोहळा इंदूरमधील भाजप आमदार गोलू शुक्ला यांचे चिरंजीव अंजनेश शुक्ला यांचा होता. हा विवाह सोहळा सध्या केवळ इंदूरमध्येच नव्हे, तर संपूर्ण देशभर चर्चेचा विषय बनला आहे. या शाही विवाहात झालेली पैशांची उधळपट्टी आणि भव्यता पाहून नेटकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
या लग्नाचे सर्वात मोठे आकर्षण ठरली ती म्हणजे फटाक्यांची आतषबाजी. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्यांनुसार, या सोहळ्यात केवळ फटाक्यांवर तब्बल 70 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. वरमाला विधी झाल्यानंतर आकाशात जी रोषणाई झाली, ती पाहून उपस्थित सर्वच थक्क झाले. या दृश्यांचे व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
संपूर्ण विवाहस्थळ हिंदू देवदेवतांच्या मूर्तींनी सजवण्यात आले होते. मुख्य मंचावर भगवान शंकराची भव्य मूर्ती विराजमान होती आणि याच मूर्तीसमोर वरमाला विधी पार पडला. या विधीसाठी करण्यात आलेली सजावट आणि प्रकाशयोजना एखाद्या भव्य चित्रपटाच्या सेटसारखी वाटत होती.
अंजनेश शुक्ला यांनी या विशेष दिवसासाठी भरजरी एम्ब्रॉयडरी केलेली शेरवानी परिधान केली होती, तर वधू सिमर ही पारंपारिक वेशभूषेत अत्यंत सुंदर दिसत होती. सिमरचा विवाह पेहराव प्रसिद्ध डिझायनर रिंपल आणि हरप्रीत यांनी तयार केला होता. या विवाह सोहळ्याला भाजप आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांतील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले.
त्या व्हिडिओवरुन वाद!
या लग्नाशी संबंधित आणखी एक व्हिडिओ वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यामध्ये वधू आणि वर इंदूरच्या खजराना मंदिरातील एका अशा भागात हार घालताना दिसत आहेत, जिथे सर्वसामान्यांना प्रवेश निषिद्ध आहे. यावरूनही आता सोशल मीडियावर चर्चा रंगली असून नियमांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आमदारांचे दुसरे सुपुत्र रुद्राक्ष शुक्ला यांनी देखील या लग्नाचे व्हिडिओ शेअर केले आहेत. एकीकडे त्यांचे समर्थक शुभेच्छांचा वर्षाव करत असताना, दुसरीकडे सामान्य जनता या उधळपट्टीवर टीका करत आहे. हा सर्व पैसा करदात्यांचा आहे का, असा सवाल काही युजर्सनी उपस्थित केला आहे. आयटी विभागाने अशा भव्य सोहळ्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही कमेंट्सच्या माध्यमातून केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर आमदार शुक्ला यांच्या कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.