RSS Chief Mohan Bhagwat Calls for Hum Do Hamare Teen Policy : नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या 100 वर्षपूर्तीनिमित्त आयोजित '100 वर्षांची संघ यात्रा: नवे क्षितिज' या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी त्यांनी लोकसंख्या धोरणावरही (पॉप्युलेशन पॉलिसी) भाष्य केले. लोकसंख्या धोरणावर मोठे विधान करताना आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले की, 'आम्ही दोन आणि आमचे तीन' असे धोरण असले पाहिजे.
जन्मदरावर मोहन भागवत म्हणाले की, 'जगात शास्त्र असे सांगतात की जर जन्मदर 3 पेक्षा कमी असेल तर ते हळूहळू नाहीसे होतात, म्हणून 3 राखले पाहिजे. सगळे समाज असे करतात. डॉक्टर म्हणतात की 3 अपत्ये असल्यास आई-वडिलांचे आरोग्य चांगले राहते. मुले आपापसात 'इगो मॅनेजमेंट' शिकतात, त्यांच्यात भांडणे होत नाहीत.'
( नक्की वाचा : Mohan Bhagwat : संघ आणि सरकार यांच्यातील 'मतभेद' आणि 'मनभेद' वर मोहन भागवत यांचे स्पष्ट उत्तर )
मोहन भागवत पुढे म्हणाले की, 'देशाची सरासरी 2.1 आहे. हे गणितात (मॅथेमॅटिक्स) असते, पण माणसांमध्ये 2.1 चा अर्थ 3 आहे. भारतातील प्रत्येक नागरिकाने त्याच्या घरात 3 मुले असावीत असा विचार केला पाहिजे. पण 3 मुलांचा खर्चही उचलावा लागेल, त्यामुळे 3 पेक्षा जास्त मुले नसावीत, हे सगळ्यांनी स्वीकारले पाहिजे.'
पुढे ते म्हणाले, 'जन्मदर सगळ्यांचाच कमी होत आहे. हिंदूंमध्ये तो आधीच कमी होता, आता तो आणखी कमी होत आहे. 3 पेक्षा कमी मुले नसावीत, यासाठी नवीन पिढीला तयार केले पाहिजे. ज्यांच्या हातात हे काम आहे, त्यांनी ते केले पाहिजे.'
"आपल्याला लोकसंख्येचा विचार करणे आवश्यक आहे, कारण लोकसंख्याशास्त्रातील बदलांचे (डेमोग्राफिक चेंज) परिणाम होतात. हा केवळ लोकसंख्येचा प्रश्न नाही, तर हेतूचा प्रश्न आहे." असंही सरसंघचालकांनी यावेळी स्पष्ट केलं.