RSS Panch Parivartan : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) या वर्षी दिवाळीच्या शुभेच्छांमध्ये एक अनोखी संकल्पना जोडली गेली आहे. संघाच्या परंपरेनुसार, ही सुरुवात कोणत्याही औपचारिक प्रसिद्धीशिवाय, स्वयंसेवकांच्या अनौपचारिक माध्यमातून करण्यात आली आहे. यंदा दिवाळीच्या निमित्ताने पाठवल्या जाणाऱ्या शुभेच्छा संदेशांमध्ये 'पंच परिवर्तन' या संकल्पनेचा आवर्जून उल्लेख केला जात आहे, ज्यामुळे हे अभियान ठळकपणे दिसून येत आहे.
दिवाळी संदेशातून जनजागृती
संघाचे स्वयंसेवक आणि त्यांच्याशी संबंधित संस्था-संघटनांकडून या वर्षी दिवाळी शुभेच्छांच्या माध्यमातून 'पंच परिवर्तन' या संकल्पनेचा मोठा जनजागृती कार्यक्रम अनौपचारिकरित्या राबवला जात आहे. स्वयंसेवक दिवाळीच्या शुभेच्छा देताना लोकांना 'पंच परिवर्तनाचे पाच दिवे' लावण्याचे आवाहन करत आहेत. या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या 'ऑडिओ-व्हिज्युअल' शुभेच्छा क्लिप्समध्ये 'चला लावू परिवर्तनाचे पाच दिवे' असे आवाहन केले जात आहे. या क्लिप्समध्ये 'पंच परिवर्तन' ही संकल्पना नेमकी काय आहे आणि ती कशी स्वीकारावी, यावर विशेष भर दिला जात आहे.
काय आहे 'पंच परिवर्तन' संकल्पना?
गेल्या 2 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमीचा कार्यक्रम, विविध भाषणे आणि चर्चांमध्ये 'पंच परिवर्तन' या संकल्पनेला सातत्याने प्राधान्य दिले आहे.सरसंघचालकांनी स्पष्ट केल्यानुसार, जर प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात 5 मूलभूत सकारात्मक बदल केले, तर त्याचा थेट परिणाम म्हणून समाज आणि देशात मोठे सकारात्मक परिवर्तन घडेल.
( नक्की वाचा : Mohan Bhagwat : 'हम दो, हमारे तीन'ची वेळ आली!लोकसंख्या धोरणावर RSS प्रमुख मोहन भागवत यांचा नवा फॉर्म्युला )
'पंच परिवर्तन' अंतर्गत समाविष्ट असलेले पाच महत्त्वपूर्ण आयाम
स्व-बोध (स्वदेशी): आपल्या संस्कृती आणि स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करणे.
कुटुंब प्रबोधन: कुटुंबात सकारात्मक आणि वैचारिक जागृती निर्माण करणे.
नागरिक कर्तव्य: प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्ये नीट पार पाडणे.
सामाजिक समरसता: समाजात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता सर्व घटकांमध्ये एकोपा निर्माण करणे.
पर्यावरण: पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील असणे.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका भाषणात राष्ट्रीय स्वसंसेवक संघाच्या पंच परिवर्तन अभियानाचा उल्लेख केला आहे.
अभियानाचा व्यापक उद्देश
यंदा प्रथमच दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणासुदीच्या निमित्ताने, संघाच्या विविध संघटना आणि स्वयंसेवकांकडून या संकल्पनेवर आधारित एक व्यापक जनजागृती मोहीम चालवली जात असल्याचे दिसून येत आहे.
या अभियानाबद्दल बोलताना, संघ विचारवंत आणि अभ्यासक अमोल पुसदकर यांनी NDTV मराठीला सांगितले की, देशभरातील स्वयंसेवकांकडून यंदा दिवाळीच्या निमित्ताने 'पंच परिवर्तन'चा जागर केला जात आहे. ते म्हणाले की, 'वंदे मातरम्'च्या धर्तीवर 'पंच परिवर्तन' हा देखील देश आणि समाज बदलण्याची क्षमता असलेला एक नवीन उद्घोष बनू शकतो. समाजातील सर्व घटकांनी यात सक्रिय सहभाग घेऊन देश आणि समाजाच्या सकारात्मक परिवर्तनाची सुरुवात करणे, हाच यामागील मुख्य उद्देश आहे.