Mahakumbh Stampede Exclusive : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नानाच्या (Amavasya snan) दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 जण जखमी झाले आहेत. मौनी अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी संगमाच्या दिवशी किती गर्दी होती, हे उपग्रहाच्या माध्यमातून आलेल्या चित्रातून स्पष्ट झालं आहे. कुंभमेळ्याची उपग्रहातून काढण्यात आलेली चित्रं NDTV ला मिळाली आहेत. त्यामधून प्रयागराजमध्ये हजारो भक्त अमृत स्नान करण्यासाठी त्रिवेणी संगमाच्या जवळ होते, हे स्पष्ट दिसत आहे. या चेंगराचेंगरीनंतर अमृत स्नान बराच काळ स्थगित करण्यात आले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उपग्रहातून मिळालेल्या चित्रातून 'संगम नोज' चं चित्र स्पष्ट दिसत आहे. याच ठिकाणी यमुना, गंगा आणि सरस्वती या नदींचा त्रिवेणी संगम आहे. उपग्रहाच्या चित्रामध्ये हजारो भक्त एका रांगेत उभे राहून त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी त्यांच्या क्रमांक येण्याची वाट पाहात आहेत.
हे फोटो चेंगराचेंगरी केल्यानंतर काही तासांनी घेण्यात आली आहेत. हे फोटो झूम इन केल्यानंतर फोटोमध्ये शेकडो होड्यांनी किनाऱ्याच्या जवळ नांगर टाकल्याचं दिसत आहे. या होड्याच भाविकांना पवित्र स्नानासाठी त्रिवेणी संगमापर्यंत घेऊन जातात.
कुंभ क्षेत्रापासून एक किलोमीटर दूर अंतरावर निर्माण करण्यात आलेल्या टेंट सिटीमध्ये भाविकांना थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पण, या फोटोमधून भाविकांची गर्दी 'संगम नोज' च्या दिशेनं जात असल्याचं दिसत आहे. संगमाच्या जवळ शेकडो होड्या देखील फोटोमध्ये स्पष्ट दिसतात.
( नक्की वाचा : Mahakumbh 2025 : महाकुंभला जाणार आहात? चेंगराचेंगरीनंतर करण्यात आलेले बदल नक्की वाचा )
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 1 च्या आसपास संगमाच्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी बॅरिकेड्स तोडण्यात आले. काही जणं उडी मारुन पुढं जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे धक्काबुक्की झाली आणि काही जण खाली पडले. जे लोकं खाली बसले होते किंवा झोपले होते त्यावर पडले. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्याचं चेंगराचेंगरीत रुपांतर झालं.
कशी आहे टेंट सिटी?
महाकुंभासाठी येणाऱ्या भाविकांसाठी उत्तर प्रदेश सरकारनं संगमाच्या जवळ तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था केली आहे. संगमाच्या ठिकाणी 4,000 हेक्टर (9,900 एकर) परिसरात टेंट सिटी नावाचं एक तात्पुरतं शहर वसवण्यात आलं आहे. ही टेंट सिटी 7,500 फुटबॉल मैदानाच्या बरोबर आहे. त्यामध्ये 150,000 टेंट आणि समान संख्येमध्ये तात्पुरते टॉयलेट उभारण्यात आले आहेत.
टेंट सिटीमध्ये 69000 LED आणि सोलर लाईट लावण्यात आले आहेत. जवळपास 15 हजार कर्मचारी इथं साफ-सफाईचं काम करत आहेत.
या तात्पुरत्या शहराचा फोटो झुम इन करुन पाहिला तर क्रॉस सेक्शनवर हजारो लोकं दिसत आहेत. हे सर्व टेंट नदीच्या काठावर बनवण्यात आले आहेत. त्याचबरोबर लोकांच्या तसंच वाहनांच्या ये-जा करण्यासाठी अनेक छोटे पूलांची निर्मिती करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश सरकारनं दिलेल्या माहितीनुसार मौनी अमावस्येच्या दिवशी 5 कोटी 70 लाख भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले.
महाकुंभमध्ये बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर प्रशासनानं कुंभमेळा परिसरात अनेक बदल केले आहे. VIP प्रवेश तसंच पास रद्द केले आहेत. कुंभ मेळ्याच्या परिसरात सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बुधवारी उपग्रहातून काढण्यात आलेल्या चित्रामध्ये टेंट सिटी परिसरात शेकोड वाहनं पार्क केल्याचंही दिसत आहे.