Jammu Kashmir Terror Attack : जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर रविवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 9 भाविकांचा मृत्यू झाला असून 33 जण जखमी झाले आहेत. वैष्णो देवी आणि शिवखेडी धामचे दर्शन करुन परतत असलेल्या भाविकांच्या बसवर हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यातून बचावलेल्या भाविकांनी त्यांचा भयंकर अनुभव सांगितला आहे. शिवखोडीवरुन कटरा परत असलेल्या बसवर हल्ला करण्यासाठी दहशतवादी दबा धरुन बसले होते. ही बस रियासीमध्ये पोहोचली त्यावेळी भरस्त्यावर उभं राहून चार दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला. यामध्ये ड्रायव्हरला गोळी लागल्यानं बस दरीत पडली. त्यानंतरही अंधाधुंद गोळीबार सुरुच होता, अशी माहिती या भाविकांनी दिली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बस दरीत पडली म्हणून...
या हल्ल्याच्यावेळी बस दरीत कोसळल्यानंच जीवदान मिळालं असं अनेक यात्रेककरुंनी सांगितली. बस रस्त्यावरच राहिली असती तर दहशतवाद्यांनी कुणालाही जिवंत सोडलं नसतं, असं त्यांनी सांगितलं. बस दरीमध्ये पडताच एकच गोंधळ उडाला. यात्रेकरु मदतीसाठी ओरडत होते. त्यावेळी देखील दहशतवाद्यांचा गोळीबार सुरुच होता, असं त्यांनी सांगितलं. या दहशतवादी हल्ल्यात 2 लहान मुलांसह 9 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्याचं वृत्त समजताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी जाऊन पीडितांना मदत केली.
या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांमध्ये एक नोएडाचा यात्रेकरु देखील आहे. त्यानं दिलेल्या माहितीनुसार बसमधील यात्रेकरु खाली पडले त्यावेळी दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य करण्यासाठी गोळीबार सुरु केला. झाडं आणि दगडांच्या मागं लपून काही जणांनी स्वत:चा जीव वाचवला. सियासी जिल्हा हॉस्पिटलमध्ये जखमी असलेल्या एका यात्रेकरुच्या पाठीला गोळी लागली आहे. मी लपलो नसतो, तर वाचलो नसतो, असं त्यानं सांगितलं.
( नक्की वाचा : Terrorist attack on devotees : जम्मू-कश्मीरमध्ये भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला )
'लाल रंगाचं मफलर आणि मुखवटा घातलेला एक अतिरेकी या बसवर गोळीबार करत असल्याचं मी पाहिलं, अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीनं दिली. आम्हाला चार वाजता निघायचं होतं, पण बस साडेपाच वाजता निघाला. त्यावेळी त्यानंतर अचानक बसवर गोळीबार झाला, असं तेरनाथ हॉस्पिटलमध्ये जखमी असलेल्या एका यात्रेकरुनं सांगितलं.
जिल्हा हॉस्पिटलमध्या दाखल असलेल्या संतोष कुमारनं सांगितलं की, 'मी बस ड्रायव्हरच्या बाजूला बसलो होतो. आमची बस घनदाट जंगलातून जात होती. त्यावेळी मी पाहिलं की लष्कराच्या ड्रेससारखे कपडे घातलेला एक व्यक्ती बससमोर आला आणि त्यानं अंधाधुंद गोळीबार सुरु केला. त्या व्यक्तीनं काळ्या कपड्यानं चेहरा आणि डोकं झाकलं होतं.'