Aama Samman : राज्यातील 18 ते 60 वयोमर्यादा असलेल्या लाभार्थी महिलांसाठी दर महिना 1500 रुपये देण्याचा निर्णय राज्यातील महायुती सरकारसाठी गेमचेंजर ठरला होता. मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयात या योजनेचा मोठा वाटा होता. त्यानंतर आता या योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय महायुती सरकारनं केला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही राज्यांनी या प्रकारची योजना सादर केली आहे. पण, या सर्व योजनांची बंपर योजना जाहीर झाली आहे. त्यानुसार लाभार्थी महिलांना दरवर्षी 40 हजार रुपये मिळणार आहेत.
काय आहे योजना?
सिक्कीम सरकारने जवळपास 32 हजार मातांना 40 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. सिक्कीममध्ये रविवारी अधिकृतपणे पहिला ‘आमा सन्मान दिवस' साजरा करण्यात आला. हा दिवस मातांच्या त्याग, धैर्य आणि राज्यासाठी दिलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांनी महिलांसाठी ही मोठी घोषणा केली. हा कार्यक्रम रंगपो क्रीडांगणावर आयोजित करण्यात आला होता, जिथे राज्यभरातील मातांसह हजारो लोक एकत्र जमले होते.
दोन टप्प्यात मिळणार रक्कम
या नवीन योजनेअंतर्गत, सिक्कीममधील जवळपास 32 हजार मातांना 40 हजार रुपयांचे अनुदान मिळेल. ही रक्कम दोन टप्प्यांमध्ये दिली जाईल. दोन्ही ठप्प्यात प्रत्येकी 20,000 रुपये मिळतील. योजनेवर सरकार 128 कोटी रुपये खर्च करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ‘आमा सन्मान दिवस' सुरू करण्याचा निर्णय वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असल्याचे सांगितले.
( नक्की वाचा : Rajnath Singh : 'सबके बॉस तो हम हैं', राजनाथ सिंह यांचं नाव न घेता ट्रम्प यांना चोख उत्तर )
या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, सिक्कीमच्या सामाजिक आणि राजकीय जीवनात, विशेषतः कठीण काळात, मातांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. माता क्रांतिकारी साथीदारांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या आहेत. त्यांचे संघर्ष आणि बलिदानात त्यांचे योगदान आहे. सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा (SKM) पक्षाचा प्रवास राज्यभरातील मातांच्या धैर्य आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहे.
मुख्यमंत्री तमांग यांच्यासाठी 10 ऑगस्ट हा दिवस वैयक्तिकरित्या महत्त्वाचा आहे, कारण हा जनमुक्ती दिवस आहे. याच दिवशी त्यांची 'अन्यायकारक तुरुंगातून' सुटका झाली होती. त्यांनी तो काळ आठवून सांगितले की, ते तुरुंगात होते, तेव्हा अनेकदा माता त्यांना भेटायला यायच्या. कधी त्यांना ओरडायला, कधी सल्ला द्यायला आणि अनेकदा लढत राहण्याचे धैर्य देण्यासाठी. त्यांच्या शब्दांनी माझ्यामध्ये क्रांतिकारी भावना जागृत ठेवली, असे ते म्हणाले. सिक्कीमच्या लोकांच्या एकता आणि दृढनिश्चयाचा आदर करत दरवर्षी जनमुक्ती दिवस आणि ‘आमा सन्मान दिवस' एकत्र साजरे केले जातील, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.