Tirupati Stampede : आंध्र प्रदेशमधील तिरुपती येथील भगवान वेंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये दर्शनाचे तिकीट मिळवताना झालेल्या चेंगराचेंगरीत सहा भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर 16 जण जखमी झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार वैंकुठद्वार सर्वदर्शनम टोकन वितरणाच्या दरम्यान हा प्रकार घडला. मंदिरातील विष्णू निवासम परिसरात ही दुर्घटना घडली.
हे टोकन घेण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती. त्या गर्दीत सहा जणांचा मृत्यू झाला. तामिळनाडूमधील एका भक्ताचाही या मृतांमध्ये समावेश आहे. या चेंगराचेंगरीनंतर चार जणांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेचा आढावा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसराचा पोलिसांनी तत्काळ ताबा घेतला तसंच त्यांनी या परिसरातून भक्तांना सुखरुप बाहेर काढले.
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू गुरुवारी (9 जानेवारी 2025 ) सकाळी तिरुपतीला जाणार असून ते या चेंगराचेंगरीमध्ये जखमी झालेल्या भाविकांची भेट घेणार आहेत. तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री नायडू यांनी देवस्थान समितीला दिले आहेत.