- मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील पूजा अहिरवार आणि करिश्मा या दोन बहिणीची पोलीस दलात निवड
- पूजा अहिरवारने सब-इंस्पेक्टर परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक मिळविला आहे
- पूजाचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून घरातील आर्थिक परिस्थिती अत्यंत गरीब होती
कष्टला जिद्दीची जोड असेल तर काही अशक्य नाही. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही जिद्द, कठोर परिश्रम आणि प्रामाणिक प्रयत्न करण्याची तयारी असेल काही शक्य आहे. गरिबी कधीही यशाच्या मार्गात अडथळा ठरू शकत नाही. याचे जिवंत उदाहरण सध्या पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेशातील अशोकनगर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील दोन तरुणींनी हे करून दाखवलं आहे. 'आकेत' गावात राहणाऱ्या पूजा अहिरवार आणि तिची छोटी बहीण करिश्मा यांनी आपल्या कुटुंबाचे नाव उंचावले आहे. या दोघींचे वडील एक मजूर आहे. घरची स्थिती अत्यंत गरिबीची आहे. अशा स्थिती या दोन्ही लेकींनी आपल्या वडीलांच्या खांद्यावरचे ओढे जणू काही खाली उतरवले आहे. मोठी लेक पोलिस उपनिरिक्षक झाली आहे. तर छोटी लेक कॉन्स्टेबल झाली आहे. घरातील दोन्ही लेकी आता पोलीस दलात दाखल झाल्या आहेत. गावाने ही या दोघींच्या यशाचे कौतूक केले आहे.
पूजा अहिरवार हीने मध्य प्रदेश सब-इंस्पेक्टर (MP SI) परीक्षेत अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातून राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेचा निकाल 7 जुलै रोजी जाहीर झाला आहे. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून पुजा येते. त्यामुळे तिचे हे यश खरोखर इतरां पेक्षा निश्चितच वेगळे आहे. कोणत्या ही सुखसोई नसताना केवळ आभ्यालाच्या जोरावर तिने ही कामगिरी केली आहे. आज संसाधनांच्या अभावाशी झगडणाऱ्या लाखो तरुणांसाठी ती एक प्रेरणा ठरत आहे. पूजाचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मजुरी करतात. विशेष म्हणजे, पूजाची लहान बहीण करिश्मा हिचीही गेल्या वर्षीच पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे या दोन्ही बहीणी आता मध्य प्रदेश पोलीस दलात काम करणार आहेत.
पूजाच्या वडीलांचे नाव सनमान अहिरवार आहे. त्यांच्याकडे गावात अवघी 7 गुंटा जमीन आहे. या जमिनीतून एकदम कमी उत्पन्न मिळते. एवढ्या कमी उत्पन्नात 4 मुलांच्या कुटुंबाचा सांभाळ करणे अतिशय अवघड होते. शिवाय त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलणे ही अत्यंत कठीण होते. मात्र, वडिलांनी मुलींना काही झालं तरी शिकवायचं असं ठरवलं होतं. किती ही मेहनत करावी लागली तरी चालेल मागे हटायचं नाही असा निश्चय त्यांनी केला होता. त्यांनी प्रसंगी मजुरी करून मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या या कष्टाचे चीज नक्कीच झाले आहे. त्यांच्या 3 मुलींपैकी 2 मुली आता मध्य प्रदेश पोलिसात सामील होऊन देशसेवा करणार आहेत.
विशेष म्हणजे पूजाचे प्राथमिक शिक्षण गावातीलच सरकारी शाळेतच झाले आहे. पुढील शिक्षणासाठी तिने पिपरई येथील शाळेत प्रवेश घेतला होता. तिथे ती संपूर्ण जिल्ह्यात पहिली आली होती. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी ती गुना येथे ही गेली. या काळात तिने NTPC, MPPSC आणि RPF अशा अनेक परीक्षा दिल्या होत्या. पण अंतिम निवडीत काही गुणांनी तिची संधी हुकली होती. मात्र, खचून न जाता तिने पहिल्याच प्रयत्नात MPSI परीक्षेत राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. 2020 मध्ये गुना येथे गेल्यानंतर बराच काळ नोकरी न मिळाल्याने पूजा निराश झाली होती. तिने घरी परतण्याचा विचार ही केला होता. अशा वेळी तिची लहान बहीण करिश्मा हिने एका खाजगी शाळेत शिकवून आपल्या पगारातून पूजाच्या शिक्षणाचा खर्च उचलला होता. करिश्माने स्वतःचा अभ्यास सुरू ठेवत 2025 च्या परीक्षेत कॉन्सटेबल पद मिळवले होते. पूजा आपल्या यशाचे श्रेय वडील आणि लहान बहिणीला देते.