- चंदीगडच्या डॉ. अक्षिता गुप्ता यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून ६९ वी रँक मिळवली
- एमबीबीएस शिक्षण घेत असताना रुग्णालयातील रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत त्यांनी स्वतः अभ्यास करून यश मिळवले
- त्यांनी कोणतेही कोचिंग न घेत ३-स्टेप रिव्हिजन पद्धतीने कठीण विषयांवर प्रभुत्व मिळवले
UPSC Success Story: जर जिद्द आणि चिकाटी असेल, तर कोणतीही अडचण तुम्हाला यशापासून रोखू शकत नाही. चंदीगडच्या डॉ. अक्षिता गुप्ता यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या थकावणाऱ्या ड्युटी सांभाळून त्यांनी देशातील सर्वात कठीण मानली जाणारी UPSC परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण भारतात 69 वी रँक मिळवून आयएएस (IAS) पद पटकावले आहे. चंदीगडच्या डॉ. अक्षिता गुप्ता यांनी प्रशासकीय सेवेची स्वप्ने पाहणाऱ्यांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. एमबीबीएसचे शिक्षण आणि हॉस्पिटलमधील नाइट शिफ्ट सांभाळत त्यांनी यूपीएससीत यश मिळवले. कोणत्याही व्यावसायिक मार्गदर्शनाशिवाय (Coaching) त्यांनी मिळवलेले हे यश त्यांच्या शिस्तबद्ध अभ्यासाचे प्रतीक आहे. 3-स्टेप रिव्हिजनच्या माध्यमातून त्यांनी कठीण विषयांवर पकड मिळवली. आज त्या पंजाबमध्ये प्रशासकीय जबाबदारी पार पाडत असून, त्यांचा हा प्रवास चिकाटी आणि ध्येयवादाचे उत्तम उदाहरण ठरला आहे.
हरियाणाच्या पंचकुला येथील रहिवासी असलेल्या अक्षिता चंदीगडच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून (GMCH) एमबीबीएस करत होत्या. तिसऱ्या वर्षात असताना त्यांच्या मनात समाजसेवेची ओढ निर्माण झाली. केवळ आजारांवर उपचार करण्यापेक्षा प्रशासनात जाऊन मोठ्या स्तरावर लोकांच्या समस्या सोडवाव्यात, या विचाराने त्यांना नागरी सेवेकडे वळवले. डॉ. अक्षिता यांचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. एका बाजूला रुग्णालयातील तासनतास चालणारी शिफ्ट आणि दुसरीकडे यूपीएससीचा अफाट अभ्यासक्रम. त्यांनी कोणताही कोचिंग क्लास न लावता 'सेल्फ स्टडी'वर भर दिला. अगदी आपल्या पर्यायी विषयाची (Optional Subject) तयारीही त्यांनी स्वतःच केली. त्यांच्या या मेहनतीमुळे त्यांना 500 पैकी 299 गुण मिळाले.
अक्षिता यांच्या यशाचे सर्वात मोठे गुपित म्हणजे त्यांची अभ्यासाची पद्धत. त्यांनी वेळेचे नियोजन करण्यासाठी एक विशेष 'स्मार्ट रिव्हिजन' पद्धत अवलंबली:
- 1. पहिली वाचन: पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित (Underline) करणे.
- 2. दुसरे वाचन: अधोरेखित केलेल्या मुद्द्यांमधील मुख्य तथ्ये (Facts) हायलाइट करणे.
- 3. तिसरे वाचन: परीक्षेच्या वेळी फक्त हायलाइट केलेले मुद्दे वाचणे.
या पद्धतीमुळे ज्या विषयाला अभ्यासायला तासनतास लागायचे, तो विषय अवघ्या 15 ते 20 मिनिटांत रिवाईज होऊ लागला. 2020 मध्ये पहिल्याच प्रयत्नात आयएएस झालेल्या डॉ. अक्षिता गुप्ता सध्या पंजाब कॅडरमध्ये आहेत. सध्या त्या पंजाबच्या माहिती आणि जनसंपर्क विभागात संचालक (Director) म्हणून सेवा बजावत आहेत. त्यांची ही जिद्द लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. डॉक्टरांची ड्युटी म्हणजे धावपळ आणि थकवा, पण याच वातावरणात डॉ. अक्षिता गुप्ता यांनी आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. 'होय, मी करू शकते' हा विश्वास उराशी बाळगून त्यांनी पहिल्याच झटक्यात 69 वी रँक मिळवली. पंचकुलाच्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील अक्षिताने स्वतःच्या नोट्स काढल्या आणि उरलेल्या वेळात अभ्यास केला. आई-वडील शिक्षक असल्याने घरात शिक्षणाचे वातावरण होतेच, पण अक्षिताने आपल्या स्मार्ट वर्कने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली.