- बिहारच्या नवादा जिल्ह्यातील नीतू कुमारी आणि नौसी शाहीन यांनी गरीबीवर मात करत मोठी झेप घेतली
- नीतू कुमारीने ही मजूराची मुलगी असून ती फायरमन अधिकारी झाली आहे.
- नौसी शाहीनने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पूर्ण केल्यावर प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळवली आहे
काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला एखाद्या चित्रपटा प्रमाणे वाटतात. अगदी स्वप्नवत. अशीच दोन तरुणींची प्रेरणादायी कहाणी समोर आली आहे. त्यांनी गरिबीवर मात करत आपल्या मजूर वडीलांचे स्वप्न साकारलं आहे. त्यासाठी त्यांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी कामाला आली. त्यामुळेच त्या यशाचं शिखर गाठू शकल्या. आज या दोन्ही मुलींचं कौतूक होत आहे. हे कौतूक पाहाताना त्यांच्या कुटुंबीयांचे ही उर भरून येत आहे. या मुलींची प्रेरणादायी कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.
बिहारच्या नवादा जिल्ह्यातील नीतू कुमारी आणि नौसी शाहीन यांची ही कहाणी आहे. त्यांनी दारिद्र्य आणि सामाजिक बंधने यावर मात करत यशाचे नवे शिखर गाठले आहे. कस्तूरबा गांधी बालिका विद्यालयाच्या या माजी विद्यार्थिनींनी आहेत. त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर मजुराची मुलगी ते अधिकारी असा थक्क करणारा प्रवास पूर्ण केला आहे. त्यांच्या या कामगिरीचा सर्वांनाच अभिमान आहे. शिवाय गावातल्या मुलींसमोर त्यांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. लग्न करण्या आधी शिका आणि मोठ्या व्हा असाच संदेश त्यांनी दिला आहे.
लग्नाचा दबाव झुगारून नीतू 'अग्निशमक अधिकारी बनली आहे. रजौली इथं मजुरी करणाऱ्या कारू राजवंशी यांची नीतू कुमारी ही मुलगी आहे. हिने 2011 मध्ये शिक्षणाला सुरुवात केली. घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिच्यावर लग्नासाठी दबाव होता. मात्र तिने शिक्षणाला प्राधान्य दिले. 2017 मध्ये दहावी आणि 2019 मध्ये बारावी प्रथम श्रेणीत ती उत्तीर्ण झाली होती. त्यानंतर तिने पुढे शिकण्याचा निर्णय घेतला. तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. मेहनत घेतली. शेवटी तिला त्यात मोठं यश मिळालं. आज नीतू बेतिया जिल्ह्यात फायरमन अधिकारी पदावर कार्यरत आहे. तिच्या मेहनतीला चांगलं फळ मिळालं. तिच्या या कामगिरी मुळे तिने कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं.
शमशेर आलम यांची मुलगी नौसी शाहीन हिने शिक्षणासोबतच जूडो-कराटेमध्येही प्राविण्य मिळवले. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून (AMU) इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर तिची निवड एका जर्मन कंपनीत झाली होती. सध्या ती दिल्लीत एका प्रतिष्ठित कंपनीत इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे. परिस्थितीवर मात करत तिने ही गगनभरारी घेतली आहे. विद्यालयाचे संचालक सत्येंद्र कुमार पांडेय आणि वार्डन रेखा कुमारी यांनी या दोन्ही कन्यांचा सत्कार केला. "मुलींना केवळ साक्षर करणे नव्हे, तर त्यांना आत्मनिर्भर बनवणे हेच आमचे ध्येय आहे," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.