अरे बापरे! सुप्रीम कोर्टाचे You Tube चॅनल हॅक, भलताच व्हिडीओ अपलोड केल्याने खळबळ

सुप्रीम कोर्टाचा युट्युब चॅनेल हॅकर्सनी हॅक केला असून यावर 'Crypto' शी निगडीत व्हिडीओ अपलोड केला आहे. सोबतच या चॅनेलचे नावही बदलण्यात आले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॅकर्सनी सुप्रीम कोर्टाच्या युट्युब चॅनलला लक्ष्य केले असून हे चॅनल हॅक करण्यात आले आहे. हॅकर्सनी या चॅनलवर क्रिप्टोकरन्सी XRP ची जाहिरात दाखवण्यास सुरुवात केली.  XRP क्रिप्टोकरन्सी ही अमेरिकेतील एका कंपनीने विकसित केली आहे.  चॅनल हॅक केल्यानंतर हॅकर्सनी सुप्रीम कोर्टाचे नाव बदलले असून त्याच्या जागी Ripple असं नाव झळकावले आहे. या चॅनलवर सुप्रीम कोर्टाच्या व्हिडीओंच्या ऐवजी क्रिप्टोशी निगडीत व्हिडीओ दाखवले जात होते. हॅकर्सनी केलेला हा हल्ला अत्यंत गंभीर आहे कारण यावर सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीचे व्हिडीओ असतात। यावरून सुनावणीचे थेट प्रक्षेपणही केले जाते.   युट्युब चॅनल हॅक केल्यानंतर सुप्रीम कोर्टाशी निगडीत सगळ्या वेबसाईटबाबत सतर्कता बाळगण्यात येत आहे. 

हल्ला कसा झाला ? 

सुप्रीम कोर्टाचे युट्युब चॅनल नेमके कुठून हॅक केले गेले आहे याचा शोध लावला जात आहे. आतापर्यंत या हल्ल्याची जबाबदारी कोणीही घेतलेली नाही. केंद्रीय तपास यंत्रणाही या हल्ल्यामुळे सतर्क झाल्या असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. तपासानंतरच हा हल्ला कुठून आणि कोणी केला याचा माग लागू शकेल. 

यापूर्वीही झाला होता हल्ला

यापूर्वी सुप्रीम कोर्टाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. 2018 साली सुप्रीम कोर्टाची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. त्यावेळी हॅकर कोण होते आणि त्यांनी कुठून बसून ही वेबसाईट हॅक केली होती हे कळू शकलं नव्हतं.