Swami Vivekanand : देशभरातून प्रत्येकी 1 रुपया गोळा करुन कसं उभं राहिलं विवेकानंदांचे शिलास्मारक?

Swami Vivekanand Jayanti 2025 : नरेंद्रनाथ दत्त ते स्वामी विवेकानंद या त्यांच्या स्थित्यंतरात कन्याकुमारीतील ध्यानाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात कन्याकुमारीचं मोठं महत्त्व आहे.

जाहिरात
Read Time: 4 mins
मुंबई:


Swami Vivekanand Jayanti 2025 : भारत देशाला महान अध्यात्मिक परंपरा आहे. ही परंपरा पुढं नेण्याचे, समृद्ध करण्याचे काम वेळोवेळी संत आणि महापुरुषांनी केलं आहे. या परंपरेतील एक तेजस्वी नाव म्हणजे नरेंद्रनाथ दत्त (Narendranath Dutt). सारं जग त्यांना स्वामी विवेकानंद म्हणून ओळखतं. 12 जानेवारी 1863 रोजी त्यांचा जन्म झाला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

स्वामी विवेकानंद यांचे आयुष्य एक प्रेरणास्रोत आहे.  सांसारिक मोह-मायेचा त्याग करुन परमेश्वर आणि ज्ञानाचा शोध घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य समर्पित केलं. अमेरिकेतील शिकागोमध्ये झालेल्या जागतिक धर्मपरिषदेत त्यांनी हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून भाषण केले. विवेकानंद यांचे ते भाषण प्रचंड गाजलं. हिंदू धर्माची पताका जागतिक पातळीवर फडकवण्याचं काम त्या भाषणाने केले. 

स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांना नेहमीच प्रेरणा देतात. त्यामुळेच त्यांची जयंती ही देशभर युवक दिन म्हणून साजरी केली जाते.

पश्चिम बंगालमधील कोलकातामध्ये जन्मलेल्या स्वामी विवेकानंदांच्या कार्याचं स्मरण करणारं भव्य शिलास्मारक हे तामिळनाडूमधील कन्याकुमारीमध्ये मोठ्या दिमाखात उभं आहे. अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर या तीन समुद्रांचा संगम कन्याकुमारीमध्ये होतो. त्या कन्याकुमारीमधील भव्य शिळेवर (दगड) हे स्मारक उभारण्यात आले आहे.

स्वामी विवेकानंद आणि कन्याकुमारीचा संबंध 

स्वामी विवेकानंद यांनी सन्यासधर्म स्वीकारल्यानंतर संपूर्ण भारतभ्रमण केले. या प्रवासात त्यांनी 1892 साली कन्याकुमारीमधील या शिळेवर ध्यान केले होते. याच ठिकाणी त्यांना दृष्टांत मिळाला, असं मानलं जातं. त्यानंतर त्यांनी 1893 साली शिकागोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शिकागोमधील जागतिक धर्मपरिषदेमध्ये त्यांचे भाषण प्रचंड गाजले. जगाला स्वामी विवेकानंदांची ओळख झाली. नरेंद्रनाथ दत्त ते स्वामी विवेकानंद या त्यांच्या स्थित्यंतरात कन्याकुमारीतील ध्यानाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात कन्याकुमारीचं मोठं महत्त्व आहे.

( नक्की वाचा : Fatima Sheikh : पहिल्या मुस्लीम शिक्षिका म्हणून सांगितल्या जाणाऱ्या फातिमा शेख बनावट पात्र? )
 

कसं उभं राहिलं शिलास्मारक?

1960 च्या दशकापर्यंत तिथं शिळा होती. स्वामी विवेकानंद यांचं जन्मशताब्दी वर्ष 1963 साली साजरं झालं. त्यावेळी कन्याकुमारीमधील काही स्थानिकांनी या शिळेवर स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. त्याला फार यश मिळालं नाही. 

Advertisement

त्यानंतर या सर्वांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवळकर यांना संपर्क केला. गोळवळकर यांनी त्यांचे जवळचे सहकारी आणि रा.स्व. संघाचे तत्कालीन सरकार्यवाह एकनाथ रानडे यांना स्मारक उभारण्याची जबाबदारी दिली. एकनाथ रानडे यांनी त्यानंतर हे स्मारक त्यांच्या आयुष्याचं ध्येय केलं. त्यामधूनच त्याची निर्मिती झाली. 

निर्मितीमधील अडथळे

कन्याकुमारीमधील भव्य विवेकानंद शिलास्मारक आज जगभरातील पर्यटकांचे आकर्षण स्थान आहे. विवेकानंद यांच्या भक्तांसाठी तर ती मंदिरासमान जागा आहे.पण, हे स्मारक सहज उभं राहिलेलं नाही. रानडे यांनी त्यांचं पुस्तक  Story of Vivekananda Rock Memorial मध्ये स्मारक उभारणीचा संपूर्ण इतिहास लिहिला आहे.

Advertisement

या पुस्तकानुसार तामिळनाडूत तेंव्हा काँग्रेसचं सरकार होतं . मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम (M. Bhaktavatsalam) यांनी स्मारकाला मदत करण्यास साफ नकार दिला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री हुमायूं कबीर यांचीही भूमिका प्रतिकूलच होती. त्यानंतरही रानडे यांनी हार मानली नाही. त्यांनी तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची भेट घेतली. 

लाल बहादूर शास्त्री यांच्या सल्ल्यानुसार रानडे यांनी या स्मारकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांची स्वाक्षरी गोळा करण्यास सुरुवात केली. तीन दिवसांमध्येच त्यांनी 323 खासदारांनी त्यावर स्वाक्षरी केली. काँग्रेस आणि डाव्या पक्षातील खासदारांचाही त्याला पाठिंबा होता. त्यानंतर रानडे यांनी पुन्हा शास्त्रींची भेट घेतली आणि त्यांच्याकडून स्मारक उभारणीची परवानगी मिळवली.

( नक्की वाचा : Mahakumbh Mela 2025 : महाकुंभ मेळ्यात कधी होणार शाही स्नान? वाचा संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्व )
 

ज्योती बसूंचा नकार पण पत्नीची मदत

स्वामी विवेकानंद शिला स्मारकाची परवानगी मिळाली. पण, त्यासाठी निधी गोळा करणे हे मोठे आव्हान होते. त्यासाठी एकनाथ रानडे सर्व पक्षाच्या नेत्यांना तसंच वेगवेगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटले. त्यांनी देखील या स्मारकाला मदत केली. 

Advertisement

स्वामी विवेकानंद बंगालचे होते. त्यामुळे रानडे यांना बंगालमधून मोठी मदत मिळेल अशी आशा होती. बंगालमधील तत्कालीन माकप नेते जे पुढे राज्याचे मुख्यमंत्री झाले अशा ज्योती बसू यांचीही रानडे यांनी भेट घेतली. त्यांना स्मारकासाठी मदत करण्याची विनंती केली.

ज्योती बसू यांनी आपण कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य असल्याचं सांगत विवेकानंद स्मारकास मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर रानडे बसू यांच्या पत्नी कमला बसू यांना भेटले. त्यांनी मदत करण्याची तयारी दाखवली. स्मारकासाठी 1100 रुपये निधी गोळा करुन दिला. 

देशभरातून निधीसंकलन

स्वामी विवेकानंद शिलास्मारक प्रत्येक देशवासियांना आपलं वाटलं पाहिजे हा उद्देश स्मारक निर्माण समितीचा होता. त्यांनी गावोगावी जाऊन सामान्य नागरिकांना हा विषय समजावून सांगितला. त्यांच्याकडून किमान एक ते कमाल पाच रुपये निधी गोळा केला. एकूण 30 लाख जणांनी या स्मारकासाठी निधी दिला.या निधीमधून हे स्मारक निर्माण झालं. 2 सप्टेंबर 1970 रोजी तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी यांनी त्याचं उद्घाटन केलं. त्यावेळी दोन महिने झालेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान इंदिरा गांधी देखील सहभागी झाल्या होत्या. 

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक झाल्यानंतर या स्मारकामध्येच दोन दिवस ध्यान केलं होतं.

आता तिथं काय होतं?

विवेकानंद शिला स्मारकाचे (Vivekananda Rock Memorial) व्यवस्थापन विवेकानंद केंद्राकडून करण्यात येते. जानेवारी 1972 मध्ये त्याची स्थापना झाली. विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून कन्याकुमारीमध्ये वेगवेगळे अध्यात्मिक कार्यक्रम तसंच योग शिबिर घेतले जातात. देशभरात अनेक शाळा या केंद्राकडून संचालित करण्यात येतात. त्याचबरोबर ईशान्य भारतामध्ये भारतीय संस्कृतीच्या प्रसाराचं काम या केंद्राच्या माध्यमातून केले जाते.