Seven Wonders Park Demolished: जगातील 7 आश्चर्यांपैकी एक असलेला ताजमहल उत्तर प्रदेशातील आग्रा शहरात आहे. पण त्याची प्रतिकृती भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आहे. अमर प्रेमाचे प्रतीक म्हणून लोक एकमेकांना ताजमहलची प्रतिकृती भेटही देतात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दोन वर्षांपूर्वी करोडो रुपये खर्चून राजस्थानच्या अजमेरमध्ये बनवलेला ताजमहलसह 7 जागतीक आश्चर्यांचे हे पार्क आता पाडले जात आहे. अजमेरमध्ये स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 11.12 कोटी रुपये खर्चून सेव्हन वंडर्स पार्कचे बांधकाम करण्यात आले होते. ख्वाजाच्या शहरात फिरायला येणाऱ्या लोकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र बनले होते. पण आता फक्त त्याच्या आठवणी उरणार आहेत.
अजमेरचं सेव्हन वंडर्स पार्क
खरं तर, अजमेरमध्ये आना सागर तलावाजवळ स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सेव्हन वंडर्स पार्कचे बांधकाम करण्यात आले होते. 2023 मध्ये त्याचे बांधकाम पूर्ण झाले होते. आना सागर तलावाजवळ असलेल्या या पार्कमध्ये लोक जगातील सर्व 7 आश्चर्यांना एकाच ठिकाणी पाहू शकत होते. येथे ताजमहलसोबतच आयफेल टॉवर, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसह सर्व 7 आश्चर्ये बनवली होती. पण आता ही सर्व 7 आश्चर्ये पाडली जात आहेत.
अधिकाऱ्यांच्या अदूरदृष्टीचे उदाहरण
अजमेरमधील 7 आश्चर्ये पाडण्याचा हा प्रकार सरकारी अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा आणि अदूरदृष्टीचे तर उदाहरण आहेच, पण त्यासोबतच लोकांच्या कररूपातील पैशांची नासाडीही आहे. खरं तर, जेव्हा या सेव्हन वंडर्स पार्कचे बांधकाम सुरू झाले होते, तेव्हाच त्याच्या जागेबद्दल आक्षेप घेण्यात आला होता. पण तेव्हाही अजमेरच्या जबाबदार अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सेव्हन वंडर्सच्या बांधकामाविरोधात एनजीटी आणि सुप्रीम कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली. एनजीटीने 11 ऑगस्ट 2023 रोजीच हे बांधकाम अवैध मानले होते. पण 17 मार्च 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर आता सेव्हन वंडर्स पार्क पाडला जात आहे.
12 मार्चपासून बंद होता अजमेरमधील सेव्हन वंडर्स पार्क
सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर राज्याच्या मुख्य सचिवांनी कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून आदेशाचे पालन करण्याचे आश्वासन दिले होते. याच अनुषंगाने 12 मार्च रोजी सेव्हन वंडर्स पार्क पूर्णपणे बंद करण्यात आला होता. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला हायड्रा मशीनच्या मदतीने उतरवण्याची कारवाई केली होती. आता सुप्रीम कोर्टाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने प्रशासनाने हा पार्क पूर्णपणे पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
आना सागर तलावाच्या पूरग्रस्त क्षेत्रात बांधकाम
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत अजमेर विकास प्राधिकरणाने (ADA) 11.12 कोटी रुपये खर्चून सेव्हन वंडर्स पार्क तयार केला होता. त्याचे संचालन 87 लाख रुपये वार्षिक करारावर दिले होते. पण सुप्रीम कोर्टाने मास्टर प्लॅन आणि वेटलँड नियमांचे उल्लंघन गंभीर मानून हा पार्क पाडण्याचे आदेश दिले. सेव्हन वंडर्स पार्कचे बांधकाम अजमेरच्या आना सागर तलावाच्या पूरग्रस्त क्षेत्रात करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
अजमेरच्या सेव्हन वंडर्स पार्कमध्ये होती जगातील 7 आश्चर्ये
- स्टॅच्यू ऑफ लिबर्टी - अमेरिका
- आयफेल टॉवर - फ्रान्स
- झुकलेला पीसा टॉवर - इटली
- ताजमहल - भारत
- गिझाचा पिरॅमिड - इजिप्त
- क्राइस्ट द रिडीमर - ब्राझील
- कोलोसियम - रोम
मीडियाला बंदी, कडक सुरक्षा व्यवस्था
पाडण्याच्या कारवाईसाठी प्रशासनाने कडक सुरक्षा व्यवस्था केली आहे. सेव्हन वंडर्सच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्थानिक पोलीस आणि एडीए कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जेणेकरून मीडिया कर्मचारी आणि सामान्य लोकांना आत जाण्यापासून थांबवता येईल. घटनास्थळी जनरेटरची व्यवस्थाही करण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ कारवाई करता येईल. राजस्थानमध्ये एनजीटीच्या आदेशावर जमिनीवर झालेली ही पहिली मोठी कारवाई आहे, ज्यामुळे इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारची कठोरता सुरू होण्याची शक्यता आहे.