तामिळनाडू भाजपा अध्यक्ष के. अन्नामलाई तीन महिन्यांसाठी सुट्टीवर जाणार आहेत. या काळात ते ब्रिटनमधील जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठात शिक्षण घेणार आहेत. त्यांना तीन महिन्यांची फेलोशिप मिळाली आहे. अन्नामलाई यांनी हा निर्णय लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच घेतला होता. लोकसभा निवडणुकीत तामिळनाडूमध्ये भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही. पण, पक्षाला मतं वाढवण्यात यश मिळालंय. राज्यातील 39 पैकी 12 जागांवर भाजपाच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अन्नामलाईंना कोणती फेलोशिप मिळाली?
अन्नामलाईंची चेवनिंग गुरुकुल फेलोशिप फॉर लीडरशिप अँड एक्सीलेंससाठी निवड झाली आहे. ही फेलोशिप नेतृत्त्व करण्याची क्षमता असलेले तरुण नेते आणि व्यावसायिक यांना देण्यात येते. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान हा अभ्यासक्रम होणार आहे. अन्नामलाईंनी ही फेलोशिप घेण्यासाठी पक्ष नेतृत्त्वाची परवानगी मागितली होती.
तामिळनाडूमधील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अन्नामलाई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांबरोबर जोरदार प्रचार केलाय. IPS ची नोकरी सोडून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. अन्नामलाई यांना अनेक ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करत प्रदेशाध्यक्ष करण्यात आलं आहे.
( नक्की वाचा : टीम इंडियाची मुंबईत निघणार विजयी मिरवणूक, वाचा संपूर्ण वेळापत्रक )
अन्नामलाई यांनी कोईमतूर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांचा डीएमके उमेदवार गणपती राजकुमार यांनी 1 लाख 18 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता. तामिळनाडूत भाजपाला एकही जागा मिळाली नाही. पण एकूण मतांच्या आकडेवारीत त्यांनी एआयडीएमकेला मागं टाकत दुसरा क्रमांक पटकावला आहे.
भाजपाच्या एका नेत्यानं दिलेल्या माहितीनुसार अन्नामलाई या फोलोशिपसाठी खूप उत्सुक होते. ते याकडं एक ब्रेक म्हणून पाहात आहे. हा ब्रेक त्यांना निवडणुकीनंतर रिचार्ज होण्यासाठी मदत करेल. या सुट्टीचा संबंध निवडणूक निकालांशी लावू नये. हा अन्नामलाई यांचा वैयक्तिक निर्णय आहे, असं या नेत्यानं सांगितलं.