तमिळनाडू: तमिळनाडूतील तिरुची येथील दिंडीगुल भागात असलेल्या एका खासगी ऑर्थो हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवारी (ता. 12 डिसेंबर) रात्री झालेल्या या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलासह 3 महिलांचा समावेश आहे. 20 हून अधिक लोक भाजले आहेत.
या आगीमध्ये 20 हून अधिक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. २ तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. दुर्घटनेतील जखमी झालेल्या सर्व रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, तामिळनाडूतील या रुग्णालयात गुरुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास आग लागली. आग कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. प्रथमदर्शनी आगीचे कारण शॉर्टसर्किट असल्याचे बोलले जात आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या होत्या. याशिवाय डॉक्टर, पोलीस कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांनीही रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात मदत केली. रुग्णालयातील आगीच्या व्हिडिओ फुटेजमध्ये इमारतीतून आगीचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आग लागल्यानंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. आग इतकी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले, त्यामुळे सर्वांचीच धावपळ उडाली. याबाबतची माहिती मिळताच दिंडीगुल जिल्हाधिकारी आणि एसपी यांच्यासह सर्व उच्च अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांपैकी सर्व सहा जण लिफ्टमध्ये बेशुद्धावस्थेत सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी सर्वांना मृत घोषित केले. श्वास गुदमरल्यामुळे या लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयातून सुमारे 30 रुग्णांना बाहेर काढल्यानंतर अग्निशमन आणि बचाव पथकांनी त्यांना लिफ्टमधून बाहेर काढले. दरम्यान, शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.