TATA Sanand Plants News: गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, आता याचा थेट परिणाम देशातील ऑटोमोबाईल क्षेत्रावर झाला आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेहिकल्स लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या अधिकृत माहितीत स्पष्ट केले आहे की, अतिवृष्टीमुळे गुजरातच्या साणंद येथील कंपनीचे उत्पादन प्रकल्प आणि या क्षेत्रातील अनेक पुरवठादारांचे प्लांट गंभीर रूपाने प्रभावित झाले आहेत. साणंद हा टाटा मोटर्सचा अत्यंत महत्त्वाचा हब आहे, जिथे कंपनीच्या सर्वाधिक खप असणाऱ्या 'टियागो, 'टिगोर' 'नेक्सन' आणि 'सिएरा' या मॉडेल्सची निर्मिती केली जाते.
गुजरातमधील 'टाटा मोटर्स'ला फटका!
या अचानक आलेल्या संकटामुळे कंपनीचे उत्पादन तात्पुरत्या स्वरूपात थांबवावे लागले आहे. सेबीच्या (SEBI) नियमांनुसार शेअर बाजाराला पाठवलेल्या माहितीत टाटा मोटर्सने नमूद केले आहे की, प्लांट आणि सप्लायर युनिट्समध्ये लवकरात लवकर कामकाज पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही दिवसांत परिस्थिती सुधारून कामकाज रुळावर येईल असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. दरम्यान, पावसामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचे मूल्यांकन सध्या सुरू आहे. कंपनीकडे नैसर्गिक आपत्ती आणि पुरापासून संरक्षणासाठी योग्य ते विमा संरक्षण उपलब्ध आहे, मात्र विम्यामधून किती भरपाई मिळेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
गेल्या काही दिवसांत अहमदाबादसह संपूर्ण गुजरातमध्ये विक्रमी पाऊस नोंदवला गेला आहे. एकट्या अहमदाबादमध्ये एकाच दिवसात २९४.६ मिमी पावसाची नोंद झाली, जो गेल्या सुमारे शंभर वर्षांमधील एका दिवसातील चौथा उच्चांक आहे. या भीषण पावसामुळे अनेक भागांत पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवले गेले. एवढेच नव्हे तर, केवळ टाटा मोटर्सच नव्हे तर साणंद आणि अहमदाबाद औद्योगिक पट्ट्यातील औषध निर्माण टेक्सटाईल आणि इतर क्षेत्रांमधील किमान अर्धा डझनहून अधिक सूचीबद्ध (Listed) कंपन्यांचे प्लांट सुद्धा या पुरामुळे प्रभावित झाले आहेत.
साणंद येथील प्लांट बंद
मागील जून तिमाहीत टाटा मोटर्सची प्रवासी वाहनांची विक्री ४६ टक्क्यांनी वाढली होती आणि कंपनीचा महिना अतिशय चांगला गेला होता. सध्या भारतीय बाजारात टाटा मोटर्सचा महसूल आणि वाटा मजबूत स्थितीत असून, मारुती सुझुकीनंतर दुसऱ्या स्थानासाठी महिंद्रा अँड महिंद्रासोबत तिची चुरस सुरू आहे.
तज्ज्ञांच्या मते, जर येत्या काही दिवसांत साणंद येथील उत्पादन पुन्हा सुरू झाले, तर बाजारावर फारसा मोठा नकारात्मक परिणाम होणार नाही कारण डीलर्सकडे गाड्यांचा पुरेपूर उपलब्ध असतो. परंतु, हा व्यत्यय लांबल्यास शोधाशोध वाढू शकते आणि ग्राहकांना गाड्यांच्या प्रतीक्षेचा सामना करावा लागू शकतो. आता संपूर्ण उद्योग जगताचे लक्ष सप्लायर युनिट्सच्या पूर्ववत होण्याकडे आणि आगामी तिमाही निकालांकडे लागले आहे.
Maharashtra Rain: सावधान! राज्यभर तुफान पाऊस बरसणार, 'या' तारखा लक्षात ठेवा; प्रशासन अलर्ट