बिहारच्या राजकारणात रविवारी मोठी घडामोड पाहायला मिळाली. राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांनी पक्षाची पूर्ण सूत्रे आता अधिकृतपणे आपला धाकटा मुलगा तेजस्वी यादव यांच्याकडे सोपवली आहेत. पाटणा येथे पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत तेजस्वी यादव यांची आरजेडीच्या 'राष्ट्रीय कार्याध्यक्ष' पदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, या नियुक्तीचा आनंद साजरा होत असतानाच लालूंची कन्या रोहिणी आचार्य यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका स्फोटक पोस्टमुळे पक्षातील आणि यादव कुटुंबातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
तेजस्वींकडे आता सर्वाधिकार
गेल्या वर्षी पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत आरजेडीला मोठा फटका बसला होता. 143 जागांपैकी पक्षाला केवळ 25 जागांवर विजय मिळवता आला. या पराभवानंतर पक्षाच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. लालू प्रसाद यादव यांची प्रकृती आणि आगामी निवडणुकांचे आव्हान लक्षात घेता, पक्षात 'राष्ट्रीय कार्याध्यक्ष' हे नवीन पद निर्माण करून तेजस्वी यांची तिथे वर्णी लावण्यात आली. लालू प्रसाद यादव यांनी स्वतः तेजस्वी यांना नियुक्तीचे पत्र सोपवले. आता पक्षाचे सर्व धोरणात्मक निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार 36 वर्षीय तेजस्वी यादव यांच्याकडे असतील.
रोहिणी आचार्य यांची सोशल मीडियाद्वारे टीका
एकीकडे तेजस्वी यांच्या पदोन्नतीची तयारी सुरू असताना, दुसरीकडे त्यांची मोठी बहीण रोहिणी आचार्य यांनी 'X' (ट्विटर) वर केलेल्या पोस्टने खळबळ उडवून दिली. रोहिणी यांनी थेट आरोप केला की, "आरजेडीची सूत्रे आता अशा घुसखोर आणि पाताळयंत्री लोकांच्या हातात गेली आहेत, ज्यांना केवळ 'लालूवाद' नष्ट करायचा आहे." त्यांनी पुढे म्हटलंय की, "आज शोषितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या या पक्षाची खरी सूत्रे ही, विरोधकांनी पाठवलेल्या लोकांच्या हाती आहे. ज्यांना पक्षाच्या हिताची काळजी आहे, अशा लोकांना वाईट वागणूक दिली जाते." रोहिणी यांनी थेट तेजस्वींचे नाव घेतले नाही मात्र त्यांना उद्देशून म्हटले की, "जर 'ते' गप्प बसले, तर या षडयंत्रात त्यांचीही साथ असल्याचे सिद्ध होईल," रोहिणी यांनी याआधीच राजकारणातून संन्यास घेत असल्याचे आणि कुटुंबाशी संबंध तोडत असल्याचे जाहीर केले होते, या ताज्या पोस्टमुळे यादव कुटुंबातील फूट पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.
लालूंच्या कुटुंबात दुफळी
केवळ रोहिणीच नाही, तर तेजस्वींचे मोठे बंधू तेज प्रताप यादव यांनीही यापूर्वी अनेकदा तेजस्वींच्या जवळच्या सहकाऱ्यांवर टीका केली आहे. तेज प्रताप यांना शिस्तभंगाच्या कारवाईमुळे पक्षातून 6 वर्षांसाठी काढून टाकण्यात आले होते, त्यानंतर त्यांनी स्वतःचा 'जनशक्ती जनता दल' स्थापन केला. तेजस्वी यांचे खास सल्लागार संजय यादव आणि रमीज यांच्यावर रोहिणी आणि तेज प्रताप या दोघांचाही तीव्र आक्षेप आहे. रोहिणी यांच्या मते, हे सल्लागार लालूंच्या मूळ कार्यकर्त्यांना डावलून पक्षाला कमकुवत करत आहेत. रोहिणी आचार्यांनी आपल्या पोस्टमध्ये असेही म्हटले की, ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी रक्त सांडले त्यांना आज विचारले जात नाही. उलट, बाहेरून आलेल्या लोकांचे महत्त्व वाढले आहे. "ज्यांनी लालूजींचा वारसा पुढे न्यायचा आहे, त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे."