Thalapathy Vijay TVK : तामिळनाडूच्या राजकारणात सध्या एका मोठ्या बदलाचे वारे वाहत असून सुपरस्टार विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने पहिल्याच निवडणुकीत अनपेक्षित मुसंडी मारली आहे. मात्र, विजयाचा हा गुलाल उधळत असतानाच सत्तेच्या चाव्या मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या बहुमताने विजय यांना थोडक्यात हुलकावणी दिली आहे. तामिळनाडूमध्ये आता त्रिशंकू विधानसभेची स्थिती निर्माण झाली असून मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी विजय यांना मोठी कसरत करावी लागणार आहे.
काय आहे त्रिशंकू विधानसभेचा पेच?
तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. नियमानुसार, सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला 118 हा बहुमताचा आकडा गाठणे आवश्यक असते. 4 मे रोजी जाहीर झालेल्या निकालात विजय यांच्या पक्षाने 108 जागा जिंकून मोठे यश मिळवले, परंतु ते बहुमताच्या आकड्यापासून अजूनही 10 पावले दूर आहेत. जेव्हा कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही, तेव्हा त्याला त्रिशंकू विधानसभा म्हटले जाते. अशा वेळी छोट्या पक्षांची आणि अपक्ष आमदारांची भूमिका अत्यंत कळीची ठरते.
( नक्की वाचा : Tamil Nadu Election 2026 महिलांना सोनं ते तरुणांना पगार; Thalapathy Vijay यांनी कशी जिंकली तामिळनाडू निवडणूक? )
राज्यपालांची भूमिका आणि अधिकार
राज्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आता सर्वांच्या नजरा राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडे लागल्या आहेत. अशा वेळी सरकार स्थापनेसाठी कोणाला बोलवायचे, याचे सर्वाधिकार राज्यपालांकडे असतात. राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला किंवा निवडणुकीपूर्वी झालेल्या आघाडीला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण देऊ शकतात. त्यानंतर संबंधित पक्षाला विधानसभेच्या पटलावर 'फ्लोर टेस्ट' (बहुमत चाचणी) द्वारे आपले संख्याबळ सिद्ध करावे लागते.
बहुमत सिद्ध करण्याचे कायदेशीर निकष
सध्याच्या परिस्थितीत विजय यांच्यासमोर काही तांत्रिक अडचणी आहेत. विजय यांनी दोन जागांवरून (पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व) निवडणूक लढवली आणि दोन्हीकडे विजय मिळवला. मात्र, नियमानुसार त्यांना एक जागा सोडावी लागेल, ज्यामुळे त्यांचे संख्याबळ 107 होईल. तसेच, सत्ताधारी पक्षाचाच विधानसभा अध्यक्ष निवडला जातो, ज्यांना सामान्य स्थितीत मतदान करता येत नाही. यामुळे प्रत्यक्ष मतदानावेळी विजय यांच्याकडे केवळ 106 मते असतील. म्हणजेच, त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी किमान 11 इतर आमदारांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे.
सत्तेसाठी कोणते पर्याय उपलब्ध?
विजय यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल, तर त्यांना इतर पक्षांशी युती किंवा तडजोड करावी लागेल. यात प्रामुख्याने खालील पर्याय दिसतात:
मोठ्या पक्षांचा पाठिंबा: 47 जागा असलेल्या AIADMK पक्षाने पाठिंबा दिल्यास विजय यांचे सरकार सहज स्थापन होऊ शकते. मात्र, यासाठी पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
छोट्या पक्षांची मदत: काँग्रेस (5 जागा), PMK (4 जागा), CPI (2 जागा), CPI-M (2 जागा) किंवा इतर अपक्ष आमदारांची मोट बांधून विजय बहुमताचा आकडा गाठू शकतात.
अनुपस्थितीचे राजकारण: जर मतदानावेळी विरोधी पक्षाचे काही आमदार गैरहजर राहिले, तर बहुमताचा आकडा खाली येतो. याचा फायदा घेऊन विजय अल्पमतात असूनही आपले सरकार वाचवू शकतात.
न्यायालयीन मार्गदर्शक तत्त्वे
त्रिशंकू विधानसभेच्या परिस्थितीत राज्यपालांनी कोणाला बोलवावे, याबाबत सरकारीया आयोग (1983) आणि पुंछी आयोग (2010) यांनी काही मार्गदर्शक तत्त्वे मांडली आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाने एस. आर. बोम्मई (1994) आणि रामेश्वर प्रसाद (2006) खटल्यांमध्ये स्पष्ट केले आहे की, बहुमताचा निर्णय राज्यपालांच्या दालनात नाही, तर विधानसभेच्या सभागृहातच झाला पाहिजे.
आता सुपरस्टार विजय आपली राजकीय जादू वापरून इतर पक्षांना आपल्याकडे खेचण्यात यशस्वी होतात की तामिळनाडूमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होऊन पुन्हा निवडणुका घ्याव्या लागतात, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल