'तिरुमला देवस्थानच्या 3 टेकड्या ख्रिश्चनांसाठी दिल्या' जगनमोहन रेड्डींवर भाजपाचा गंभीर आरोप

Advertisement
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

तिरुपती बालाजीमध्ये दिल्या जाणाऱ्या लाडूंच्या प्रसादामध्ये प्राण्याची चरबी आढळल्याची धक्कादायक बाब उघड झाल्यानं देशभरात खळबळ उडाली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या प्रकरणात माजी मुख्यमंंत्री जगनमोहन रेड्डी यांच्यावर आरोप केले आहेत. तर जगनमोहन यांच्या YSR काँग्रेस पक्षानं हे सर्व आरोप फेटाळलेत. तेलुगु देसमपाठोपाठ आता भाजपानंही जगनमोहन यांना या प्रकरणात लक्ष्य केलं आहे. भाजपा नेते आणि आंध्र प्रदेशचे माजी प्रभारी सुनील देवधर यांनी या प्रकरणात जगनमोहन रेड्डी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

'3 टेकड्या ख्रिश्चनांना दिल्या'

तिरुमला देवस्थानाकडून आलेली बातमी धक्कादायक आहे. हा हिंदूविरोधातील मोठा कट आहे. जगनमोहन रेड्डींना शिक्षा झालीा पाहिजे, अशी मागणी देवधर यांनी केली. त्याचबरोबर जगनमोहन रेड्डी हे ख्रिश्चन आहेत. तिरूमला देवस्थानला 7 हिल्स म्हटलं जातं. त्यामधील 3 टेकड्या त्यांनी ख्रिश्चनांसाठी दिल्या, असा गंभीर आरोप देवधर यांनी केला. 

जगनमोहन रेड्डी यांनी श्रद्धा नसलेल्या व्यक्तीला प्रसाद कंत्राट दिले होते. तिरुपती-तिरुमलामध्ये धर्मांतर करण्याचा त्यांचा कट होता. तिरुमला बसेलमध्ये जेरुसलेम यात्रेची जाहिरात केली होती. तेलुगु शाळा ख्रिश्चन मिशिनरीला देण्याचा त्यांचा कट होता, तो हाणू पाडला, असा दावा देवधर यांनी केला आहे. 

( नक्की वाचा : तिरुपती बालाजीच्या प्रसादात प्राण्यांची चरबी ! प्रयोगशाळेतील रिपोर्टमधून सत्य उघड )
 

'महाराष्ट्रातही हेच होईल'

YSR काँग्रेस ही आंध्र प्रदेशातील शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आहे. जगनमोहन रेड्डी ख्रिश्चन आणि अर्बन नक्षलींच्या बळावर सत्तेत आले होते. शरद पवार चर्च आणि इफ्तार पार्ट्यांना जातात. ठाकरेंच्या मागे कोणता समाज आहे, हे दिसून येतंय. महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीला कौल दिला तर पंढरपूर, शिर्डी मंदिरातही असेच लाडू वापरले जाऊ शकतात, अशी टीका देवधर यांनी केली. या प्रकरणात कोणतंही राजकारण नाही. आता कोणत्याही निवडणुका नाहीत. आम्ही वारंवार त्यांच्या विरोधात आंदोलन करत आहोत, असंही देवधर यांनी स्पष्ट केलं.