Kolkata Doctor Murder : 'तुमच्या बॉयफ्रेंडसोबत....', डॉक्टरांच्या आंदोलनावर खासदाराची जीभ घसरली

Kolkata Doctor Murder : ममता बॅनर्जी यांच्या पक्षातील खासदारानं डॉक्टरांच्या आंदोलनावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

कोलकातामधील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. गेल्या आठवडाभरापासून या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत आहेत. देशभरातील डॉक्टर्स या प्रकरणाचा वेगवेगळ्या माध्यमातून निषेध करत आहेत. कोलकातामध्ये डॉक्टरांच्या आंदोलनाची धग तीव्र आहे. सत्तारुढ ममता बॅनर्जी सरकारच्या कारभारावरही या प्रकरणामुळे प्रश्न उपस्थित झाले आहेत. पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षातील खासदारानं डॉक्टरांच्या आंदोलनावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

खासदाराची जीभ घसरली

तृणमूल काँग्रेसचे खासदार अरुप चक्रवर्ती (TMC MP Arup Chakraborty ) यांनी बांकुरामधील एका सभेत बोलताना वादग्रस्त वक्तव्य दिलं. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना उद्देशून ते म्हणाले की, 'आंदोलनाच्या नावावर तुम्ही घरी जाऊ शकता किंवा तुमच्या बॉयफ्रेंडसोबत फिरु शकता. पण या आंदोलनामुळे एखादा रुग्ण दगावला. त्यामुळे लोकांच्या संतापाचा उद्रेक झाला, तर आम्ही तुम्हाला वाचवायला येणार नाहीत,' असा इशारा त्यांनी दिल्याचं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'नं दिलं आहे.

 ( नक्की वाचा : नर्सला ओलीस ठेवून डॉक्टरनं केलं भयंकर कृत्य, हॉस्पिटलमध्येच घडला सर्व प्रकार )
 

 'डॉक्टर आंदोलन करत आहेत. आंदोलनाच्या निमित्तानं ते बाहेर जात आहेत. लोकांना उपचार मिळत नाहीत. स्वाभाविकच लोकांचा राग त्यांच्यावरच निघेल,' असंही चक्रवर्ती यांनी पुढं सांगितलं. 

पहिलेच नेते नाही

डॉक्टरांच्या आंदोलनावर वादग्रस्त वक्तव्य करणारे चक्रवर्ती हे पहिलेच तृणमूलचे नेते नाहीत. यापूर्वी बंगाल उदयन गुहा आणि कल्याण बॅनर्जी या तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीही याच पद्धतीनं भाषा वापरली आहे. ममता बॅनर्जी यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा या नेत्यांनी दिला आहे.