- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल बाबात लोकसभेत मोठी घोषणा
- नवीन प्रणालीमुळे टोल बूथ्स पूर्णपणे संपवले जातील आणि वाहनचालकांना रांगेत थांबण्याची गरज राहणार नाही.
- राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर १० ठिकाणी सुरू केला गेला आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत एक मोठी घोषणा केली आहे. ही घोषणा टोलबाबत करण्यात आली आहे. टोल विषयी अनेक तक्रारी आहेत. त्या पार्श्वभूमीवर गडकरी यांनी केलेली ही घोषणा विशेष महत्वाची मानली जाते. येत्या एका वर्षात देशातील टोल कलेक्शनची सध्याची व्यवस्था पूर्णपणे बदलली जाईल असं त्यांनी सांगितले. शिवाय सर्व टोल बूथ संपवले जातील याची घोषणा ही त्यांनी केली आहे. नव्या प्रणालीमुळे टोल भरण्यासाठी वाहनांना रांगेत उभे राहावे लागणार नाही, ज्यामुळे वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे असं यावेळी गडकरी यांनी सांगितले.
गडकरींनी सांगितले की, ही नवीन प्रणाली सध्या प्रायोगिक तत्त्वावर 10 ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. पुढील एका वर्षात ती संपूर्ण देशभरात लागू केली जाईल. यानंतर टोल टॅक्सचे पेमेंट केवळ इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे केले जाईल. या 'इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन'मुळे टोल नाक्यांवर थांबण्याची गरज संपेल. सध्या देशात 10 लाख कोटी रुपयांच्या 4,500 हून अधिक महामार्ग प्रकल्पांवर काम सुरू आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने टोल कलेक्शन सुव्यवस्थित करण्यासाठी राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन (NETC) कार्यक्रम विकसित केला आहे. याशिवाय, ज्या वाहनांना FASTag नाही किंवा तो काम करत नाही, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 15 नोव्हेंबरपासून लागू झालेल्या नवीन नियमानुसार, आता दुप्पट रोख शुल्क (2X) भरण्याऐवजी, UPI द्वारे पेमेंट केल्यास केवळ 1.25 पट टोल टॅक्स भरावा लागतो.
भविष्यातील इंधन 'हायड्रोजन'वर भर दिला जाईल असं ही गडकरी यांनी स्पष्ट केले आहे. गडकरींनी यावेळी दिल्लीतील प्रदूषणावरही भाष्य केले. केंद्र सरकार पर्यायी इंधनांना प्राधान्य देत आहे. त्यांनी स्वतः टोयोटा मिराई (Toyota Mirai) या हायड्रोजन इंधन-सेल कारचा वापर सुरू केल्याचे सांगितले. 'हायड्रोजन हेच भविष्यातील इंधन आहे,' असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र टोलबाबत त्यांनी केलेली घोषणा ही दिलासा देणारी निश्चितच ठरणार आहे.