2025 हे वर्ष जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक चढ-उतारांनी भरलेले आहे. 2025 वर्ष सरायला अवघे काही दिवस उरले आहेत. वर्षभरात काही क्षणांनी डोळ्यात अश्रू आणले, तर काही क्षणांनी भरभरून आनंद दिला. वर्ष संपत असताना 10 महत्त्वाच्या घटनांचा फोटोद्वारे आढावा घेऊयात.
पहलगाम हल्ला
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला केला. बैसरण व्हॅलीत प्रवेश करत, दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात 26 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नौदल अधिकारी लेफ्टनंट विनय नारवाल यांच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या त्यांची पत्नी हिमांशी नारवाल याचा फोटोने भारतीयांच्या डोळ्यात पाणी आणले.
ऑपरेशन सिंदूर
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने सीमेपलीकडील दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या ऑपरेशनसाठीची पत्रकार परिषद अत्यंत खास होती. कारण भारतीय दलांचे प्रतिनिधित्व दोन महिला लष्करी अधिकाऱ्यांनी केले. कर्नल सोफिया कुरेशी (आर्मी) आणि विंग कमांडर व्योमिका सिंह (एअर फोर्स) यांनी संयुक्त पत्रकार परिषदेतून जगाला या कारवाईची माहिती दिली.
भारताची अवकाश भरारी
भारतीय हवाई दलाचे (IAF) चाचणी वैमानिक शुभ्रांशु शुक्ला Axiom Mission 4 चा भाग म्हणून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले भारतीय अंतराळवीर ठरले. 1984 मध्ये राकेश शर्मांच्या उड्डाणानंतर चार दशकांनी अंतराळात प्रवास करणारे शुक्ला हे दुसरे भारतीय नागरिक ठरले.
व्हाईट हाऊसमधील संघर्ष
मार्च 1, 2025 रोजी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. रशियाच्या आक्रमणाविरुद्ध अमेरिकेने दिलेल्या लष्करी आणि राजकीय मदतीबद्दल युक्रेनियन नेत्यांनी आभार मानले नाहीत, असा आरोप ट्रम्प यांनी या बैठकीदरम्यान केल्याने ही भेट तणावपूर्ण ठरली.
महिला संघाने विश्वचषकावर कोरलं नाव
भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच विश्वचषक विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात संघाने 2 नोव्हेंबर रोजी डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या एका रोमहर्षक अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून ही ट्रॉफी जिंकली.
अमेरिकन स्थलांतरितांविरोधात कारवाई
डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्ता स्वीकारल्यापासून अमेरिकेतील अवैध स्थलांतरणाविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. या कारवाईत पकडलेल्या अवैध स्थलांतरितांना बेड्या ठोकून आणि लष्करी मालवाहू विमानातून त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आले.
नेपाळमध्ये 'जेन झीं'चे आंदोलन
सप्टेंबरमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरसकट बंदी घातल्यानंतर नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचारविरोधी आंदोलने सुरू झाली. यात मुख्यतः जनरेशन झेडचे विद्यार्थी (Gen Z Students) आणि तरुण नागरिक सहभागी होते. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने 76 लोकांचा मृत्यू यात झाला. 9 सप्टेंबर रोजी तत्कालीन पंतप्रधान केपी ओली शर्मा (KP Oli Sharma) यांनी राजीनामा दिला आणि तीन दिवसांनी माजी न्यायमूर्ती सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान बनल्या.
हाँगकाँग इमारत दुर्घटना
नोव्हेंबरमध्ये हाँगकाँगमध्ये एका कॉम्पेक्सला लागलेल्या भीषण आगीत 159 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, तर हजारो लोक विस्थापित झाले. इमारतीच्या नूतनीकरणादरम्यान ही आग लागली होती.
एअर इंडियाचं विमान अपघातग्रस्त
12 जून रोजी अहमदाबाद विमानतळावरून लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे जाणारे एअर इंडियाचे फ्लाईट 171 उड्डाणानंतर 32 सेकंदांत क्रॅश झाले. विमानातील 12 क्रू सदस्य आणि 230 प्रवाशांपैकी केवळ एक प्रवासी वाचला. बोईंग 787-8 ड्रीमलाइनर एका मेडिकल कॉलेजच्या होस्टेल ब्लॉकवर कोसळले, ज्यामुळे जमिनीवरही 19 लोकांचा मृत्यू झाला आणि 67 जण जखमी झाले.
गाझामधील संघर्ष आणि उपासमार
7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धामुळे आणि गाझामध्ये मदतीचा मार्ग रोखल्यामुळे, यावर्षी गाझा पट्टीमध्ये उपासमार आणि तीव्र संघर्षाची परिस्थिती कायम राहिली.