रस्त्या शेजारी रोज भाजी विक्रीचा धंदा असलेला सामान्य व्यक्ती. पण त्याला नशिबाने अशी काय साथ दिली की त्याचं सर्व आयुष्यच पालटलं. तो रातोरात करोडपती झाला. यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. एखाद्या चित्रपटाला शोभेल असचं हे सर्व वाटेल. पण हे सत्य आहे. हे प्रत्यक्षात घडलं आहे. एका भाजीविक्रेत्याने एक दोन नाही तर 11 कोटींचा जॅकपॉट जिंकला आहे. दिवाळीत काढलेलं लॉटरीचं तिकीट त्याच्या घरी लक्ष्मी घेवून आलं आहे. त्यामुळे या भाजी विक्रेत्याला एक सुखद धक्काच बसला आहे.
जॅकपॉट लागला अन्...
दिवाळीच्या (Diwali) पावन पर्वाच्या अगदी आधी घेतलेल्या एका निर्णयामुळे राजस्थानच्या कोटपूतली येथील एका सामान्य भाजी विक्रेत्याचे नशीब पूर्णपणे पालटले आहे. 32 वर्षीय अमित सेहरा यांनी पंजाब राज्य लॉटरीच्या प्रतिष्ठित दिवाळी बम्पर 2025 मध्ये 11 कोटी रुपये (Rupees 11 Crore) इतका मोठा जॅकपॉट जिंकला आहे. रस्त्याच्या कडेला भाजीची गाडी लावून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अमित यांच्यासाठी ही लॉटरीची (Lottery) कमाई एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही.
संघर्षानंतर नशिबाची साथ
अमित सेहरा यांनी हे चमत्कारी तिकीट, ज्याचा क्रमांक A438586 आहे. पंजाबमधील बठिंडा शहरातून केवळ ₹500 मध्ये त्यांनी खरेदी केले होते. 31 ऑक्टोबर रोजी लुधियाना येथे लॉटरीचा ड्रॉ (Draw) काढण्यात आला. त्यात अमित यांचा नंबर लागला. अमित व त्यांच्या कुटुंबाची दिवाळी खऱ्या अर्थाने 'बम्पर' करून टाकली. ही केवळ एक मोठी रक्कम नाही, तर रोजच्या संघर्षातही आशा न सोडणाऱ्या एका व्यक्तीची ही प्रेरणादायी कथा आहे. या घटनेने नशीब कोणत्याही क्षणी दार ठोठावू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.
कुटुंबासाठी शिक्षणावर लक्ष
विजयी अमित सेहरा यांनी मंगळवारी 04/11/2025 संध्याकाळी कुटुंबासह बठिंडा येथे लॉटरीच्या पहिल्या बक्षिसाच्या दाव्याची (Claim) प्रक्रिया पूर्ण केली. या मोठ्या विजयाची बातमी पसरताच कोटपूतली-बहरोड जिल्ह्यातील त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. अमित यांनी सांगितले की, इतकी मोठी रक्कम जिंकणे त्यांच्यासाठी स्वप्नवत आहे. या रकमेचा उपयोग ते कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी करतील. या तिकीटमध्ये दुसरे बक्षीस 1 कोटी रुपये आणि तिसरे बक्षीस 50 लाख रुपये होते.