बिहारला कष्टकऱ्यांचा कारखाना म्हटले जाते. येथील लोक खूप मेहनती आणि हुशार असतात. बिहारमध्ये प्रतिभेची काहीच कमी नाही. अशीच एक प्रेरणादायी कथा बिहारच्या एका छोट्या गावातील गृहिणीची आहे. ज्यांनी घर सांभाळत आपलं स्वप्न पूर्ण केलं. बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यातील रामनगर महेश या दुर्गम गावातील एका गृहिणीने पहिल्याच प्रयत्नात UGC NET जून 2025 परीक्षा पास केली. घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळून, सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी ही हे यश मिळवलं आहे. त्यांनी आपल्या एका मुलाखतीत हा सर्व प्रवास सांगितला आहे. तो खरोखरच प्रेरणादायी आहे.
6 ते 7 तास अभ्यास करून परीक्षा पास केली
UGC NET परीक्षेत नीतू कुमारी यांनी हिंदी विषयात 76.91 टक्के गुण मिळवले. नीतू केवळ 24 वर्षांची आहे. त्यांनी असिस्टंट प्रोफेसर, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि पीएचडी पात्रतेसाठी अर्ज केला होता. नीतू सांगतात की, "मी माझ्या अभ्यासाचा वेळ दररोज तीन भागांमध्ये विभागला होता. मी सकाळी 7 वाजेपर्यंत घराची कामे संपवायची. त्यानंतर 9 वाजेपर्यंत अभ्यास करत असे. दुपारच्या जेवणानंतर आणि थोड्या विश्रांतीनंतर, मी दुपारी 1 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पुन्हा अभ्यास करत असे. रात्री, घराची सर्व कामे संपवून आणि मुलाला झोपवून, मी रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत पुन्हा अभ्यास करत असे. मी दररोज 6 ते 7 तास अभ्यास करू शकले." असं त्यांनी सांगितलं.
कोणत्याही कोचिंगशिवाय परीक्षा केली पास
नीतू सांगतात की, "मी कोणत्याही पुस्तकांवर अवलंबून राहिले नाही, तर पूर्णपणे माझ्या शिक्षकांनी दिलेल्या नोट्सवर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या लेक्चर्स आणि शॉर्ट नोट्स तयार करून अभ्यास केला. याशिवाय मी खूप उजळणी केली. कोणतीही परीक्षा पास करण्यासाठी अभ्यासासोबतच उजळणी खूप महत्त्वाची असते." नीतू सांगतात की, "सासरवाडीत राहून UGC NET ची तयारी करणे माझ्यासाठी थोडे कठीण होते. पण ते माझ्या आयुष्याचा भाग बनले, आणि माझ्या यशाचे कारणही तेच ठरले." असं ही त्यांनी सांगितलं.
पती आणि आजोबांनी पूर्ण पाठिंबा दिला
"मला सर्वात जास्त प्रेरणा माझे पती सुमित ठाकूर आणि माझे आजोबा यांच्याकडून मिळाली. ज्यांनी मला नेहमी प्रेरित केले आणि माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवला. त्यांच्या प्रोत्साहनाने मला मोठे ध्येय गाठता आलं. शिवाय हार पत्करू नकोस हे त्यांनीच आपल्याला सांगितलं. "हे निश्चितच कठीण होते. पण याचा फायदा असा झाला की NET चा दुसरा पेपर आमच्या पदव्युत्तर विषयाशी जुळणारा होता. त्यामुळे मी दोघांची एकाच वेळी तयारी करू शकले. मी डिसेंबरमध्ये माझ्या पहिल्या वर्षाची पीजी परीक्षा दिली. त्यानंतर फेब्रुवारीपासून NET ची पूर्ण तयारी सुरू केली. पहिला पेपर सामान्य स्वरूपाचा होता, त्यामुळे मी त्यासाठी अतिरिक्त वेळ दिला." आता मिळालेल्या यशामुळे आपण समाधानी असल्याचंही नीतू यांनी सांगितलं.