अलिकडच्या काळात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हृदयविकाराचा त्रास जाणवत आहे. अगदी चालता बोलता, जेवणाच्या ताटावर जीममध्ये वर्कआऊट करताना अनेकांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत. उत्तर प्रदेशमधून अशीच एक दुर्दैवी बातमी समोर आली असून अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
उत्तर प्रदेशातील बागपत येथे एका सात वर्षांच्या मुलीला शाळेत खेळता खेळता जीव गमवावा लागला. अपेक्षा असे या मृत मुलीचे नाव असून ती इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात नेला आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बरौत कोतवाली परिसरातील बिजरौली गावात ही मुलगी तिची श्वेता आणि तिच्या आजोबांच्या घरी राहत होती. गुरुवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली. 11 वाजण्याच्या सुमारास ती शाळेच्या ग्राऊंडवर आपल्या मैत्रिणींसोबत खेळत होती. खेळत असताना अचानक मुलीच्या छातीत दुखू लागल्याने ती बेशुद्ध पडली.
या प्रकारानंतर संपूर्ण शाळेच्या परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच मुलीचे मामा शाळेत पोहोचले आणि त्यांनी तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोस्टमार्टममध्ये मुलीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मुलीच्या कुटुबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, बीडमधूनही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बीडमध्ये परीक्षा देत असताना एका 24 वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिद्धार्थ मासाळ हा विद्यार्थी पदवीच्या पहिल्या वर्षाची परीक्षा देत होता. के एस के महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असतानाच त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याने त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले. यामध्ये त्याच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये गाठी तयार झाल्याने त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याचे समोर आले.