Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील पीलीभीत जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, येथे दोन सख्ख्या मामांनी आपल्याच दोन अल्पवयीन भाचींचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे. आईची हत्या आणि वडील तुरुंगात गेल्यानंतर निराधार झालेल्या या मुलींचा ताबा मामांनी घेतला होता. मात्र, याच नराधम मामांनी मोठ्या भाचीवर बलात्कार केला आणि धाकट्या बहिणीची पैशांसाठी विक्री केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
अनाथ मुलींचा मामानेच केला घात..
याबाबत पीडित १७ वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या वर्षी जून महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत ती आणि तिची १६ वर्षीय धाकटी बहीण बरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आपल्या मामाच्या गावी राहायला गेल्या होत्या. दरम्यान, ३ जुलै रोजी त्यांच्या आईची वडिलांनीच हत्या केल्याची बातमी त्यांना मिळाली. वडील तुरुंगात गेल्यानंतर या दोन्ही मुली पूर्णपणे अनाथ झाल्या आणि त्यांचा सांभाळ मामांकडे सोपवण्यात आला. याच परिस्थितीचा फायदा घेत मामांनी त्यांचे शोषण सुरू केले.
Crime News: रस्त्यावर भयंकर दृश्य.. जखमी तरुण, गुप्तांग कापलेलं; रक्तरंजित घटनेने महाराष्ट्र हादरला
सप्टेंबर महिन्यात दोन्ही मामांनी धाकट्या बहिणीला कुठेतरी नेले, त्यानंतर ती बेपत्ता झाली. 'मामांचे फोनवर होणारे संभाषण मी ऐकले, तेव्हा त्यांनी पैशांसाठी माझ्या लहान बहिणीची विक्री केल्याचे मला समजले,' असा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे. लहान बहिणीला विकल्यानंतर मोठ्या मुलीवर मामांची वाकडी नजर वळली. मार्च महिन्यात एका रात्री एका मामाने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला, तर दुसरा मामा दाराबाहेर पाळत ठेवून उभा होता.
एकीवर अत्याचार, दुसरीला विकलं
इतकेच नव्हे तर, या नराधमांनी पीडितेला पोलीस अधीक्षक कार्यालयात नेऊन तिला धमकी दिली. "जर तू आम्ही सांगतो तसे व्हिडिओमध्ये बोलली नाहीस, तर तुझ्या लहान बहिणीला जीवे मारू," अशी धमकी देऊन तिच्याकडून 'मी स्वमर्जीने घरी जात आहे' असा खोटा जबाब नोंदवून घेतला. शेवटी धाडस एकवटून पीडितेने पोलिसांत धाव घेतली.
बरखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी प्रमेंद्र कुमार यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, ज्या मामाने हा अत्याचार केला, तोच पीडितेच्या आईच्या हत्या प्रकरणात तक्रारदार होता. सध्या पोलीस पीडितेच्या वयाची कागदपत्रांद्वारे पडताळणी करत असून, त्यानंतर 'पोक्सो' (POCSO) अंतर्गत कलमे वाढवली जातील. बेपत्ता असलेल्या १६ वर्षीय मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.
Beed News : बीडमध्ये खळबळ! वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात एका कैद्याचा मृत्यू, काय घडलं?